घरताज्या घडामोडीढगफुटीचा महावितरणला सर्वाधिक फटका

ढगफुटीचा महावितरणला सर्वाधिक फटका

Subscribe

विजेचे खांब भुईसपाट झाल्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला.

गेल्या २२ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीसह निसर्ग प्रकोपाचा महावितरणला सर्वाधिक फटका बसला असून, अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी दिवस-रात्र एक करून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले असले तरी दरवेळी नैसर्गिक आपत्तीत होणारे प्रचंड नुकसान महावितरणसाठी चिंतेची बाब ठरत आहे.मुसळधार पाऊस, छोट्या-मोठ्या नद्यांना आलेले पूर यामुळे महावितणची यंत्रणा अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत गेली. परिणामी शहरासह संपूर्ण तालुका अंधारात बुडाला. ठिकठिकाणचे ट्रान्सफॉर्मर, तसेच भलेमाठे टॉवर आणि विजेचे खांब भुईसपाट झाल्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाला. एकीकडे आपत्तीचे तांडव सुरू असताना वीज नसल्यामुळे मोबाईल यंत्रणा बंद पडल्याने दुसर्‍या बाजूला संपूर्ण तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कोलमडलेली वीज यंत्रणा पूर्ववत करण्याचे आव्हान स्वीकारून येथील महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दुसर्‍या दिवशीपासून कामाला लागले. मनुष्यबळ अपुरे पडू नये याकरिता कापडे येथील आदित्य इन्टरप्रायझेस या फर्मचीही मदत घेण्यात आली होती.

पोलादपूर विभाग एमआयडीसीतून येणार्‍या एक्स्प्रेस फिडरच्या उच्चदाब वाहिनीचे दोन पोल, तसेच तुर्भे राजावाडी फिडरचा एक पोल आणि लघुदाब वाहिनीचे तुर्भे खुर्द, तुर्भेखोंडा, वझरवाडी, माटवण, हावरे या ठिकाणचे २० पोल कोसळले होते. हा सर्व परिसर खलाटीचा असून, सावित्री नदी काही गावांच्या मधून वाहत असून, दोन दिवस नदीच्या प्रवाहाला उतार नव्हता. अशा अवघड परिस्थितीत जीवावर उदार होऊन सवाद गावाच्या पलिकडे जाऊन नव्याने खड्डे खोदून पोल उभे करण्यात आले. वाहिन्यांच्या तुटलेल्या तारा जोडण्याचे काम करण्यात आले आणि गावे आणि वाड्यांसह शहर प्रकाशाने उजळले.

- Advertisement -

त्यानंतर ग्रामीण विभागात कोतवाल परिसरात उच्चदाब वाहिनीचे ३ पोल आणि परसुले, पळचिल, पांगळोली येथे लघुदाब वाहिनीचे १६ पोल पडले होते. तर पितळवाडी विभागात पितळवाडीसह फौजदारवाडी, नाणेघोळ, आडाचा कोंड, पवार वाडी, लहुळसे, केवनाळे, आंबेमाची, ढवळे आदी भागासह अनेक गाव हद्दीत उच्चदाब वाहिनीचे ४3 पोल आणि लघुदाब वाहिनीचे ८३ पोल कोसळले होते. तर सर्व विभागात एकूण ५ ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. या ठिकाणी पोहचणे दिव्य असताना कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर यांच्या नियोजनबद्घ मार्गदर्शनाखाली आणि वेळोवेळी गोरगाव कार्यालयातून योग्य त्या साहित्याची पूर्तता झाल्यामुळे येथील उप कार्यकारी अभियंता सुनील सूद आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वीज दोन आठड्याच्या आधीच सुरू करण्यात यश मिळविले. त्यामुळे एरव्ही टीका आणि वादाच्या भोवर्‍यात सापडणार्‍या महावितरण अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


हेही वाचा – शरद पवारांना मराठा म्हणून भेटत नाही, जातीच्या मुद्द्यावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -