खड्डे, चिखल ठरतेयं पेण एसटी स्थानकातील प्रवाशांची डोकेदुखी

उन्हाळ्यात धुरळ्याचा त्रास तर पावसाळ्यात तुंबणार्‍या पाण्याचा प्रवाशांना नाहक त्रास

muddy headaches at Pen ST station
खड्डे, चिखल ठरतेयं पेण एसटी स्थानकातील प्रवाशांची डोकेदुखी

एसटी महामंडळाचे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती स्थानक अशी बिरूदावली मिरविणार्‍या येथील स्थानकाला चिखल आणि खड्ड्यांनी अक्षरशः वेढले आहे. या ठिकाणाहून पावसाळ्यात प्रवास करणे ही प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. वर्षोनुवर्षांचे हे दुखणे असले तरी याबाबत कुणालाही गांभीर्य वाटत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या बस स्थानकातून कुठेही प्रवास करणे सुलभ होत असल्याने प्रवाशांची कायम गर्दी असते. त्यामुळे स्थानक सुसज्ज असणे क्रमप्राप्त असताना प्रत्यक्षात दुर्लक्षित आहे. उन्हाळ्यात धुरळ्याचा त्रास तर पावसाळ्यात तुंबणार्‍या पाण्याचा आणि खड्ड्यांचा, हे ठरून गेलेले आहे. पावसाचा जोर वाढला की स्थानकाच्या आवाराला तलावाचे स्वरुप येते. त्यामुळे बसची प्रतीक्षा करणार्‍या प्रवाशांच्या हालाला पारावार उरत नाही. काही वेळेला बाहेरून आलेल्या प्रवाशाला काही कारणास्तव खाली उतरायचे असेल तर तो तलावसदृश्य परिस्थिती पाहून चरफडत निमूटपणे बसमध्ये बसणे पसंत करतो.

कामावार जाणार्‍यांना, तसेच विद्यार्थ्यांना चिखिलमिश्रित पाणी अंगावर उडत असल्याचा अनुभव अनेकदा येत असतो.या स्थानकातील प्रसाधगृहाचीही दुरवस्था झाल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. तसेच स्थानकात पाणपोई, कँटिन अशा सुविधा नसल्याने प्रवाशांना बाहेरील हॉटेलातून पाणी किंवा खाद्यपदार्थ आणावे लागतात. आवारात पाणी तुंबलेले असेल तर बसमधून खाली उतरणे नकोसे वाटते. आवारात खासगी वाहनांचा अनधिकृत तळ निर्माण झाल्याने येणार्‍या-जाणार्‍या बसेसना अडथळा होतो. अनेकदा खासगी वाहनांचे चालक एसटी बसच्या चालकाशी उद्धट वर्तन करीत असल्याचे दिसून येते. महत्त्वाचे स्थानक असताना एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी आश्चर्याची भावना व्यक्त करतात.

पेण स्थानकातील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्याच्या बाजूला गटार असल्याने त्याचे पाणी बस स्थानकात येत असते. त्यामुळे बर्‍याच दिवसापासून पाणी तेथे साचून राहते. हे पाणी तातडीने काढण्यात येईल.
– अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड


हे ही वाचा – Navratri 2021: मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यास परवानगी; टोपेंनी सांगितल्या अटी-शर्थी