मुंबई मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली; इक्बाल चहल नवे आयुक्त

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ५ मे रोजी मुंबईत दारू बंदी करण्याचा निर्णय घेतला होता.

praveen pardesh and Iqbal singh chahal
मुंबई मनपाचे माजी आुयक्त प्रवीण परदेशी आणि नवे आयुक्त इक्बाल सिंह चहल

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. या परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेला त्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत होते. तसेच राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी भर बैठकीत परदेशी आणि मेहता यांचे इतर अधिकाऱ्यांसमोर खटके उडाले होते. चहुबाजूंनी नाराजी वाढत गेल्याने अखेर आज त्यांची बदली नगर विकास विभागात अतिरीक्त आयुक्तपदावर करण्यात आली आहे. त्यांच्या जागी इक्बाल सिंह चहल यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन आयुक्त इक्बाल सिंह चहल हे नगर विकास खात्याचे प्रधान सचिव होते.

हे वाचा – मुंबई मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांचा दारूबंदी करण्याचा निर्णय 

अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेत

मुंबई मेट्रोच्या माजी संचालक अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर माजी अतिरीक्त सचिव जयश्री बोस यांची बदली महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाच्या संचालक पदावर करण्यात आली आहे.

ठाणे मनपा आयुक्त संजीव जैस्वालही मुंबईत

यासोबतच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल जे अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतिक्षेत होते. त्यांनाही मुंबई महानगरपालिकेत पाठविण्यात आले आहे. ते अतिरिक्त सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्याजागी जाणार आहेत, तर जऱ्हाड यांची बदली मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवपदावर करण्यात आली आहे.

तर मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांची बदली सार्वजनिक बांधकाम विभागात मनोज सौनिक यांच्या ठिकाणी करण्यात आली आहे. तर मनोज सौनिक यांना वित्त विभागातील अतिरीक्त सचिवपदी पाठविण्यात आले आहे.

त्या निर्णयामुळे वाढली नाराजी

४ मे पासून देशभरात मद्याची दुकाने आणि अत्यावश्यक सेवेत नसणारी पाच दुकाने उघडण्याची परवानगी केंद्राने दिली होती. त्यानंतर दोन दिवस मद्याच्या दुकानाबाहेर झुंबड उडाल्यामुळे प्रवीण परदेशी यांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करत ५ मे रोजी मुंबईतील मद्याची दुकाने आणि अत्यावश्यक सेवेत नसणारी सर्व दुकाने १७ मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ६ मे रोजी काढलेल्या एका पत्रकात इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरची दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली होती. मात्र या पत्रातला मजकूर अनेकांना खटकला. एकाबाजूला रुग्णसंख्या वाढत असताना राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये मानापनावरुन बरेच नाट्य घडत होते. त्याची परिणीती अखेर परदेशी यांची उचलबांगडी करण्यात झाली.

closer of liquor shops
मुंबईतील दारूबंदीचा आदेश

closer of liquor shops 2