घरताज्या घडामोडीगोरेगावमधील २०२ बांधकामांवर महापालिकेची कारवाई

गोरेगावमधील २०२ बांधकामांवर महापालिकेची कारवाई

Subscribe

गोरेगाव पश्चिम परिसरातील शास्त्रीनगर नाल्यातील अखेर सर्वच्या सर्व अतिक्रमणे हटवण्यात महापालिकेला यश आले आहे.तब्बल २०२ बांधकामांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करून नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोकळा करून दिला आहे.

गोरेगाव पश्चिम परिसरातील शास्त्रीनगर नाल्यातील अखेर सर्वच्या सर्व अतिक्रमणे हटवण्यात महापालिकेच्या पी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास क्षिरसागर यांच्या पथकाला यश आले आहे. तब्बल २०२ बांधकामांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करून नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोकळा करून दिला आहे. त्यामुळे या नाल्याची रुंदी आता ९ फुटांवरून २२ फूट केली जाणार आहे. ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर,शास्त्रीनगर,सिद्धार्थ नगर इत्यादी परिसरात मुसळधार पावसामुळे दरवर्षी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. यामुळे मोठ्याप्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन रोगराईचे प्रमाण वाढते. त्यामुळे ‘ब्रिमस्टोवॅड’प्रकल्पाअंतर्गत गोरेगाव पश्चिमेला असलेल्या शास्त्रीनगर नाल्याचे लिंक रोड ते मालाड खाडी या दरम्यान रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नदीचे पात्र १४७६ फूट एवढ्या लांबीचे असून सध्याच्या ९ फुटांवरुन ४९ फूट रुंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

९ फूट रुंदीचा नाला होणार तब्बल २२ फूट रुंदीचा 

मात्र,या नाल्यालगत उत्तर बाजूला असणारी २०२ बांधकामे आणि दक्षिण बाजूला असणारी ३५८ बांधकामे अशाप्रकारे एकूण ५६० बांधकामांमधील कुटुंबांचे तसेच गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याच्या प्रक्रीयेमुळे याला विलंब होत होता.
मात्र, शास्त्रीनगर नाल्याच्या उत्तर बाजूला असणारी २०२ बांधकामे हटविण्याची तीन दिवस सुरु असलेली मोहिम आज पूर्ण झाली आहे. या कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या जागेत नाल्याचे प्रत्यक्ष रुंदीकरण करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात आली असल्याचे पी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास क्षिरसागर यांनी स्पष्ट केले.
लिंक रोड ते मालाड खाडी दरम्यान केवळ ९ फूट रुंद असणारा हा नाला आता तब्बल २२ फूट रुंदीचा होणार आहे. नाल्याच्या रुंदीकरणाचे हे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असून यानंतर नाल्याच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत अडीच पटींनी वाढ होणार आहे.प रिणामी,गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर, शास्त्रीनगर, सिद्धार्थ रुग्णालय, सिद्धार्थ नगर आदी परिसरात पावसाच्या पाण्याच्या निचरा अधिक जलद गतीने होऊन परिसरातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल,असाही विश्वास क्षिरसागर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

४० पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम पूर्ण 

परिमंडळ ४ चे उपायुक्त रणजीत ढाकणे यांच्या मार्गदर्शनात व मुंबई पोलिसांच्या विशेष सहकार्याने गोरेगाव पश्चिम परिसरात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यानबांगूरनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोभा पिसे यांच्या नेतृत्वात ४० पोलिस कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ९० कामगार-कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी कर्तव्यावर हजर होते. या कामासाठी जेसीबी,पोकलेन आणि डंपर यासह इतर आवश्यक साधनसामुग्रीचाही वापर करण्यात आला,असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -