रेल्वे पास देण्यासाठी महापालिकेची जय्यत तयारी पंधरा ऑगस्टपासून सुरुवात

कोविड लसीकरणाचे दोन डोस घेवून 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर मासिक रेल्वे पास दिला जाणार आहे.

Municipal Corporation is well prepared for issuing railway passes Starting from the fifteenth of August

कोविड 19 च्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयुक्त दालनात महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या अधिपत्याखाली महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, एसआरपीएफ, सीआरपीएफ, रेल्वे अधिकारी यांचे समवेत ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीत नागरिकांना 15 ऑगस्टपासून रेल्वे पास देणेबाबत रेल्वे व्यतिरिक्त इतर विभागांनी करावयाच्या कामांबाबत ऊहापोह करण्यात आला.

कोविड लसीकरणाचे दोन डोस घेवून 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर मासिक रेल्वे पास दिला जाणार आहे. हा पास देतेवेळी होणारी संभाव्य गर्दी टाळण्‍यासाठी व रेल्वे पास वितरण प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी तिकीट काऊंटरजवळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 व दुपारी 3.00 ते रात्री 11.00 या दोन शिफ्टमध्ये महापालिका कर्मचा-यांचे प्रत्येक रेल्वे टिकीट काऊंटर शेजारी स्वतंत्र मदत कक्ष (हेल्प डेस्क) उभारले जाणार आहे.

कोविड 19 लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत व फोटो असणारे मूळ शासकीय ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत (प्राधान्याने आधारकार्ड)  घेवून आलेल्या नागरिकांची सर्व प्रथम महानगरपालिकेच्या मदत कक्षांमध्ये या कागदपत्रांची पडताळणी होऊन मदत कक्षातील कर्मचारी त्यावर पडताळणी केल्याचा शिक्का मारुन दिनांकासह स्वाक्षरी करतील. पडताळणी केलेले प्रमाणपत्र व ओळखपत्र (प्राधान्याने आधारकार्ड) रेल्वेच्या टिकीट काऊंटरवर दाखविल्यानंतर प्रवासासाठीचे विहीत शुल्क भरल्यावर संबंधित नागरिकांना मासिक रेल्वे पास प्राप्त होईल.

महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या टिटवाळा, ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण, आंबिवली आणि शहाड या रेल्वे स्थानकामधील रेल्वे टिकीट काऊंटरवर लसीकरण प्रमाणपत्राची व फोटो असणा-या शासकीय ओळखपत्राची (आधारकार्ड) पडताळणी करण्यासाठी महापालिका कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. रेल्वे पाससाठी रेल्वे स्थानकावर येणा-या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेच्या आगमन आणि बहिर्गमन मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे टिकीट काऊंटरवर रेल्वे पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

नागरिकांनी रेल्वे प्रवास करतांना रेल्वेचा मासिक पास, लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची प्रत जवळ बाळगणे अनिवार्य राहील. राज्य शासनाची नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासबाबत ऑनलाईन सेवा कार्यान्वित झाल्यानंतर नागरिक स्वत:चा युनिव्हर्सल पास प्राप्त करुन घेवू शकतील, अशा नागरिकांना प्रवास करतेवेळी रेल्वे मासिक पास आणि युनिव्हर्सल ऑनलाईन पास जवळ बाळगणे अनिवार्य राहील.


हेही वाचा – १२७ वे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर