लग्नाच्या वऱ्हाडी बसला अपघात; दोन अपघातात विदर्भात ९ जणांचा मृत्यू

nagpur bhandara accident
नागपूर - भंडारा रोडवरील अपघात

आज सकाळापासून विदर्भात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूर – भंडारा रोडवर लग्नाच्या वऱ्हाडी बसने ट्रक कंटेनरला धडकल्यामुळे मोठा अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शिंगोरी गावाजवळ ही दुःखद घटना घडली. तर अकोला येथे टेपोंची ढडक लागून २ वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शिंगोरी गावाजवळील मौदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लग्नाहून परतणाऱ्या एका वऱ्हाडी बसने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ५ ते ६ जण जखमी आहेत. जखमींवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर जागीच दोघांचा मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की यात बसचा समोरच्या भागाचा संपुर्ण चुरा झाला आहे.

अकोल्यात वारकऱ्यांचा मृत्यू

अकोला जिल्ह्यातील शेगाव येथे आज सकाळी झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावरुन चालत असताना मागून आलेल्या टेम्पोने धडक दिल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या अपघात प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.