कुंपणानेच खाल्ले शेत, पोलीस ठाण्यातील मुद्देमालावर पोलिसांनीच मारला डल्ला

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे, गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या संरक्षणासाठी नेमलेल्या पोलीस अंमलदारानेच मुद्देमालावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध फसवणूक, बोगस दस्तऐवज तयार करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गणेश वसईकर असे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गणेश वसईकर हे नौपाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते, त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर ते २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाले. वसईकर यांच्याकडे नौपाडा पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षाचे कारकून म्हणून २०१३ पासून काम पहात होते. मे २०१८ मध्ये वसईकर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कारभार सांभाळणारे अंमलदार यांनी मुद्देमाल कक्षातील गुन्ह्यातील मुद्देमालाची नोंदी तसेच मुद्देमाल तपासले असता त्यात त्यांना काही त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली असता ६ गुन्ह्यातील मुद्देमालातील काही मुद्देमाल आणि रोकड गहाळ झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.

दरम्यान, नौपाडा पोलिसांनी सेवानिवृत्त वसईकर यांना चौकशी कामे बोलावले असता त्यांनी येण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे या अफ़रातफरीत वसईकर यांचा सहभाग असल्याचा संशय येताच नौपाडा पोलिसांनी फसवणूक तसेच कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी वसईकर यांनी ६ गुन्ह्यात जमा असलेल्या मुद्देमालांपैकी रोकड तसेच ऐवज असा एकूण २१ लाख ४५ हजार ७३३ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्याकडे या गुन्ह्याबाबत माहिती विचारली असता याबाबत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसून केवळ चौकशी सुरू असल्याची माहिती देऊन याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली.