सानपाडा : नवी मुंबईतील सानपाडा परिसरात भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सानपाड्यातील डी-मार्ट परिसरात अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याचे समजते. पाच ते सहा राऊंड गोळीबार करून दोन आरोपी फरार झाले असून या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास केला जात आहे. (Navi Mumbai Firing At Sanpada Station Near D Mart Police Take Charge In Case)
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सानपाड्यात डी-मार्ट आहे. या डी मार्टच्याजवळच आरोपींनी राजाराम ठोके यांच्यावरती गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात राजाराम ठोके हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजाराम ठोके हा एपीएमसी मार्केट मधील कचरा कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदारी वरून फायरिंग झाल्याचे समजते. सानपाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या गोळीबारामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सानपाड्यातील ज्या रस्त्यावर गोळीबार झाला त्या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची गर्दी असते. वर्दळीच्या याच रस्त्यावर भर दिवसा गोळीबार झाल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोळीबार अज्ञातांकडून करण्यात आला असून गोळीबार करणारे दोन आरोपी झाले आहेत.
सानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फरार झाले आहेत. पोलीस संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान आरोपी ज्या बाजूला गेले त्या ठिकाणचे काही सीसीटीव्ही तपासले जात आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस आणि फॉरेन्सिक टीम करीत आहेत.
पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास सानपाडा परिसरातील डी-मार्टजवळ दोन आरोपींनी गोळीबार केला. या गोळीबारात राजाराम ठोके यांना 2 ते 3 गोळ्या लागल्याची शक्यता आहे. जखमी ठोके यांची तब्येत स्थिर असून, या प्रकरणी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस एकत्रित मिळून तपास करीत आहेत.
हेही वाचा – Beed : बीड सरपंच हत्येप्रकरणी तीन आरोपी पाहिजेत; पोलिसांचं प्रसिद्धी पत्रक जारी