Navi Mumbai International Airport : बीएनएचएसच्या अहवालात पाणथळातल्या पक्ष्यांना धोका असल्याचे गंभीर निष्कर्ष

जगभरातील लाखो स्थलांतरीत पक्षी दरवर्षी या संभाव्य विमानतळाजवळच्या पाणथळ क्षेत्रामध्ये येत असतात.

Navi Mumbai International Airport: Danger to waterfowl
Navi Mumbai International Airport : बीएनएचएसच्या अहवालात पाणथळातल्या पक्षांना धोका असल्याचे गंभीर निष्कर्ष

नवी मुंबई, पनवेलजवळ होणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथे येणार्‍या पक्ष्यांना धोका असून विमानतळावर उतरणार्‍या विमानांना पक्ष्यांच्या धडकीचा गंभीर धोका संभवण्याचा अहवाल बीएनएचएसने दिला आहे. या अहवालानंतर पर्यावरण तसेच पक्षी प्रेमींनी नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांना निवेदन देत तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.जगभरातील लाखो स्थलांतरीत पक्षी दरवर्षी या संभाव्य विमानतळाजवळच्या पाणथळ क्षेत्रामध्ये येत असतात. पाणथळ क्षेत्रावरच्या भरावामुळे नवे आश्रयस्थान आणि राहण्याच्या स्थळांच्या शोधार्थ ते बराच वेळ हवेत राहू शकतात, यामुळे विमानांसाठी तो धोका ठरण्याची शक्यता बीएनएचएसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘एनएमआयए’ साठी ही भविष्यातली अत्यंत गंभीर जोखीम …

एनआरआय पाणथळ क्षेत्रे लेसर फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो आणि बदक तसेच विविधांगी बगळ्यांच्या मोठ्या थव्यांची निवासस्थाने आहेत. बांधकाम, भराव घालणे आणि मासेमारीसाठी पाणथळ क्षेत्रांच्या सुधारणांसारख्या अनेक अडचणींमुळे पक्ष्यांचे हे मोठे थवे जेएनपीटी आणि उरणच्या भूअंतर्गत पाणथळ क्षेत्रांकडे वळू शकतात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी (एनएमआयए) ही भविष्यातली अत्यंत गंभीर जोखीम ठरु शकते, असे बीएनएचएसचा अहवाल म्हणतो.पाणजे पाणथळ क्षेत्र हे नवी मुंबईमधले सर्वात मोठे स्थलांतरीत वॉटरबर्ड स्थळ असून ते महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम पक्षीस्थळांपैकी एक आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याशी निगडीत असलेल्या या आणि इतर पाणथळ क्षेत्रांना संरक्षित स्थळे घोषित करण्याची सूचना करण्यात आली होती, कारण भरतीच्यावेळी अभयारण्यात जेव्हा पूर येतो, तेव्हा अभयारण्यातील वॉटरबर्ड्स निवार्‍यासाठी या स्थळांचा वापर करतात. असे बीएनएचएसचे म्हणणे आहे.

नॅटकनेक्ट फाऊंडेशनने पुन्हा एकदा शासनाला पाणजे, बेलपाडा, भेंडखळ, एनआरआय, आणि टीएस चाणक्यचा आंतर्भाव करत पाणथळ क्षेत्रे संरक्षित करण्याची खात्री करण्याची विनंती केली आहे. नॅटकनेक्ट जागतिक स्थलांतरीत पक्षीदिनाच्या निमित्ताने पक्ष्यांच्या गंतव्यस्थळाचे रक्षण करण्यासाठी डिजीटल अभियान चालवत आहे.पाणजे एमएमआर जैवविविधता उद्यान म्हणून संवर्धन करण्याची सूचना शासनाच्या विचाराधीन आहे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले. आम्ही आता नागरी उड्डाणमंत्री सिंधिया यांचे लक्ष वेधले असल्याचे ते म्हणाले.

साचलेल्या पाण्याची घातकता

सांडपाणी, पावसाचे पाणी आणि सर्वोच्च भरतीच्यावेळी भरतीचे पाणी गावांमध्ये साचते, खासकरुन भरतीचे पाणी खाडी आणि वॉटर चॅनल्समध्ये साठून गंभीर स्वरुपाच्या आरोग्य व स्वच्छता समस्यांना कारणीभूत ठरते. शासन आणि एनजीटीने आदेश देऊन देखील पाणजे येथील पाणी येण्याचे मार्ग बंद असलेले आढळतात. एका बाजूला भरतीचे पाणी थांबवले गेले आहे तर दुसर्‍या बाजूला पावसाच्या पाण्याचा निचरा करु दिला जात नाही. हे अतिशय घातक आहे.
-नंदकुमार पवार, अध्यक्ष, एकविरा प्रतिष्ठान

                                                                                       वार्ताहर – राजकुमार भगत


हे ही वाचा – तर मनसेविरोधात निवडणूक आयोगात तक्रार, नाशिक पोलिस आयुक्त ‘Action’ मोडमध्ये