Corona Vaccination: ४ लाख कोरोना लस खरेदीसाठी नवी मुंबई मनपाचे ग्लोबल टेंडर!

Navi Mumbai Municipal Corporation will procure 4 lakh corona vaccines through global tender
नवी मुंबई मनपा

कोविडची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यापूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांचे लसीकरण व्हावे. याकरिता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कोविड लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर प्रसिध्द करण्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नियोजित केले आहे. ग्लोबल टेंडरद्वारे नवी मुंबई मनपा ४ लाख कोविड लस खरेदी करणार आहे.

१६ जानेवारी पासून कोविड लसीकरणाला डॉक्टर्स, नर्सेस अशा आरोग्यकर्मींपासून सुरुवात झालेली असून टप्प्याटप्प्याने पोलीस, सुरक्षाकर्मी असे पहिल्या फळीतील कोरोना योध्दे, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षावरील व्यक्ती आणि त्यानंतर १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत २ लाख ५१ हजार ३५५ नागरिकांचे लसीकरण झालेले असून सध्या लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने लसीकरणाच्या गतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर कोविडची तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यापूर्वी जास्तीत जास्त नवी मुंबईकर नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर कोविड लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर प्रसिध्द करण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिद्ध करून लवकरात लवकर लस खरेदी करण्याची प्रक्रिया तत्परतेने करण्यात येत आहे.

नवी मुंबईची लोकसंख्या साधारणत: १५ लाख असून त्यामध्ये १८ वर्षावरील नागरिकांची अंदाजित १० लाख ८० हजार इतकी लोकसंख्या विचारात घेता आत्तापर्यंत २.५१ लक्ष नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्यातील ५८ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अशा रितीने साधारणत: ८ लाख २९ हजार नागरिकांचे प्रथम डोसचे लसीकरण प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाकडून प्राप्त लसींचा पुरवठा लक्षात घेऊन लवकरात लवकर लसीकरण होण्याच्या दृष्टीने सदर लस खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.

नागरिकांच्या लसीकरणात होणारा विलंब या लस खरेदीमुळे टाळला जाईल

१ मे २०२१ च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लस उत्पादकांमार्फत एकूण उत्पादन केलेल्या लसीचा ५० टक्के साठा केंद्र सरकारला दिला जात असून उर्वरित लस राज्य शासन, खासगी संस्था आणि कंपन्यांना देण्यात येत आहे. त्यात नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त लस पुरवठा लक्षात घेता नागरिकांच्या लसीकरणात होणारा विलंब या लस खरेदीमुळे टाळला जाईल. अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच सद्यस्थितीत ४ लक्ष लसीचे डोसेस खरेदी करण्याचे प्रस्तावित केले असून त्याकरिता ग्लोबल टेंडर प्रसिध्द करण्यात येत आहे. –  अभिजीत बांगर (नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त)

शासनाच्या निर्देशानुसार लस खरीदीचे धोरण निश्चित करू!

कोरोना विषाणूपासून नागरिकांचे जीव वाचविणे हेच आमचे पहिले प्राधान्य आहे. त्यासाठी लसीकरण करून संभाव्य धोका टाळता येणार आहे. शासनाने दिलेले निर्देशांची नक्कीच काटेकोरपणे आणि जलदगतीने अंलबजावणी केली जाईल. कोविड लस खरेदीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तातडीने नियोजन केले जाईल. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोविड लसीकरणाला लवकरच गती येईल. –  सुधाकर देशमुख (पनवेल महानगरपालिका आयुक्त)