Navaratri 2021 :- कोलाडमध्ये महिलांच्या शक्ती-तुरा नाचांनी नवरात्रोत्सवाची रंगत वाढली

कालौघात शक्ती-तुरा ही लोककला हळूहळू कमी होत आहे.

Navratri special women's Shakti-Tura dances in kolad
Navaratri 2021 :- कोलाडमध्ये महिलांच्या शक्ती-तुरा नाचांनी नवरात्रोत्सवाची रंगत वाढली

नवरात्रोत्सवानिमित्त रोहे तालुक्यातील देवकान्हे येथील श्री गावदेवी मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या शक्ती-तुरा नाचाने या उत्सवाची रंगत चांगली वाढवली. हा नाच पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. युवा सामाजिक कार्यकर्ते राजेश सुटे आणि रोठ बुद्रुकचे माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी हे नाचाचे सामाने पुरस्कृत केले होते. नाचाच्या सामन्यात दोन्ही बाजूकडील शाहिरांनी विविध शैलीतून आपली कला सादर करून बहारदार गाणी सादर केल्याने, तसेच दोन्हीकडून चाललेली चढाओढ आणि उत्तराला प्रतिउत्तर मिळत गेल्याने याची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. शक्तीवाले महिला मुंढाणी-पेण आणि तुरेवाले महिला वणी-रोहे यांच्यात हा रंगतदार सामना झाला. कालौघात शक्ती-तुरा ही लोककला हळूहळू कमी होत असल्याने असे नाच अभावानेच पहावयास मिळतात.

त्यामुळे या नाचकलेची आवड असलेल्यांनी मोठी हजेरी लावत दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना प्रोत्साहान देतानाच आयोजकांनाही धन्यवाद दिले. ही परंपरागत कला जोपासण्याची नितांत गरज असल्याची भावनाही काहींनी व्यक्त केली. कलेच्या प्रचार व प्रसार व्हावा यासाठी घेत असलेल्या मेहनीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे. तर येथे संपन्न झालेल्या या ना मंडळाने विविध ढंगात व विविध रंगात तसेच शाहिरी जलशात आपली कला पेश केल्याने रसिकवर्गही बेहद खुश होऊन त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले.

शक्ती तुरेवाल्यांची परंपरा

मनोरंजनातून जनजागृती करण्याची परंपरा महाराष्ट्राला फार पूर्वीपासून आहे. यात कोकणातील पारंपारिकरित्या सुरु असणारे ‘बाल्या नाच’ हे अग्रस्थानी आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे २००, रत्नागिरी १५० आणि सिंधुदर्गात १५० कला पथके आपल्या कला सादर करतात. प्राचीन काळापासून ही परंपरा सुरु असून, शक्ती आणि तुरेवाला हा एक फड असतो. यात स्त्री आणि पुरुष यांच्या वर्चस्वाची लढाई पुरातन काळापासून चालत आल्याचे म्हटले जाते. यामध्ये शंकर आणि पार्वती यांची विचारधारेवर आधारित हा शक्ती आणि तुरेवाल्यांचा संवाद असतो.

‘बाल्या नाच’ नाव कसे पडले?

कोकणातील रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. एकपिकी शेती असल्याने बहुतांश तरुण रोजगारानिमित्त बहुतांश तरुण वर्ग मुंबईत स्थिरावला. मुंबईत शेठकडे ही मुले काम करायची आणि सणासुदीला सुट्टी घेऊन कोकणात जायला निघायची.ज्या शेठकडे ही मुले काम करायची व सुट्टी असेल तेव्हा कोकणातील तरुण मंडळी जमेल तेव्हा एकत्र येऊन कोकणातील पारंपरिक नृत्य करायचे. पूर्वीचे शेठलोक या मुलांना ‘बाल्या’ या टोपण नावाने संबोधायचे. त्यातून ‘बाल्याचा नाच’ म्हणून नाव पडले.


हे ही वाचा – OBC Reservation : आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती, पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर निशाणा