रात्रीच्या प्रवासात महिलांना एसटीची सुरक्षा ; बसमधील दिवे आता सुरुच राहणार

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ

Now ST safety for women on night trips
रात्रीच्या प्रवासात महिलांना एसटीची सुरक्षा ; बसमधील दिवे आता सुरुच राहणार

एसटी बसमधून रात्रीचा प्रवास करताना महिलांनी दिवे लावण्याची विनंती केल्यास ते सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे बसमधून रात्रीचा प्रवास करणार्‍या प्रत्येक महिलेचा प्रवास सुरक्षित आणि निर्भय वातावरणात होण्यास मदत मिळणार असून, सरकारने घेतलेल्या या निर्णायाचे महिला वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महिलांना एकटीने प्रवास करणे आणि त्यातच रात्रीचा प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. महिलांना प्रवासाच्या दरम्यान सुरक्षित वाटावे यासाठी सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. प्रवास करताना रात्रीच्या वेळी बसमधील दिवे बंद करण्यात येत असतात. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये कायम भीती आणि दहशतीची टांगती तलवार लटकलेली असते. आता नवीन नियमानुसार रात्रीच्या प्रवासात महिलांनी दिवे सुरू ठेवण्याची विनंती केल्यास चालक-वाहकांना दिवे सुरूच ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

विनंती करावी लागणार

महिला रात्रीचा प्रवास करत असतील आणि त्यांना असुरक्षित वाटत असल्यास ते वाहकाला दिवे सुरू ठेवण्यासाठी विनंती करू शकतात. त्यानुसार बसमधील दिवे सुरूच राहणार आहेत.

“सरकारने खूपच चांगला निर्णय घेतला आहे. नाही तर रात्रीचा प्रवास करताना दिवे गेले की भीती वाटायची. प्रवासाच्या दरम्यान बहुतेक वेळा अनोळखी व्यक्ती असतात. त्यामुळे असुरक्षित वाटते. आता दिवे सुरू राहणार असल्याने भीती बाळगण्याचे कारण राहिले नाही.”
-छाया ठाकूर, पनवेल

“रात्रीच्या प्रवासात बहुतेक करून बसमधील दिवे बंद केले जातात. प्रवासात कोण कसे आहे, याची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे सोबतीला कुणी नसेल तर लांबच्या प्रवासात झोपही घेता येत नाही. सारखी मनात भीती आणि असुरक्षितता असते. आता मात्र दिवे सुरू ठेवण्याचा सरकारचा निर्णय खरोखरच चांगला आणि महिलांना दिलासा देणारा आहे.”
-गीतांजली मोकल, हाशिवरे

“सरकारने घेतलेला अतिशय चांगला निर्णय आहे. त्यामुळे आता महिलांना रात्री-अपरात्री प्रवास करताना सुरक्षित वाटणार आहे.”
-अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड

आगार बसेस

  • अलिबाग  ६०
  • पेण       ४८
  • महाड    ५९
  • श्रीवर्धन   ५९
  • कर्जत    ३३
  • रोहे      ५०
  • मुरुड    ४१
  • माणगाव ३६

                                                                                   

                                                                                               वार्ताहर – रत्नाकर पाटील


हे ही वाचा – ‘मोनो’ प्रवास होणार ‘सुपरफास्ट’, वर्षभरात १० स्वदेशी मोनोरेलच्या ताफ्यात होणार दाखल