Pimpri Chinchwad Crime : पिंपरी पोलिंसांच्या कारवाईला यश ; योगेश जगताप हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड

दोन आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या कारवाईला पिंपरी पोलिसांना यश मिळाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील सांगवी या परिसरात घडलेल्या योगेश जगताप हत्याप्रकरणातील आरोपींचा शोध लागला आहे. आरोपींना पकडताना पोलिस आणि आरोपींमध्ये चकमक घडली. या चकमकीमध्ये आरोपीने तीन राउंड फायर केले आहे. या चकमकी दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या योगेश जगताप हत्याप्रकरणी पिंपरी पोलीस आरोपींचा तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणातील आरोपी चाकणमधील कुरवंडी गावात असल्याची माहिती मिळाली. आरोपींची माहिती मिळताच पोलिसांच्या चार पथकांनी आरोपींना पकडण्याची कारवाई सुरु केली. या कारवाई दरम्यान, आरोपी गणेश मोटे,अश्विनी चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार केला. मात्र या झटापटीनंतर अखेर पोलिसांना या आरोपींना पकडण्यात यश आले आहे. यावेळी पोलिसांनी ४ पिस्तुल,तीन जिवंत काडतुस आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाई दरम्यान पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश उपस्थित असल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण ?

पिंपरी चिंचवडमधील सांगवी या परिसरात सकाळी साडेदहाच्या सुमारास व्यावसायिक योगेश जगताप यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात ६ गोळ्यांपैकी २ गोळ्या जगताप यांना लागून ते गंभीर जखमी झाले मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयात नेले असता, त्यांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यातील आरोपी गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवीतील परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने संगनमत करुन हल्ला करण्याचा कट रचला. दत्त जयंती निमित्त कार्यक्रमाची तयारी योगेश जगताप करत होता. त्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.


हे ही वाचा – भरस्त्यात कारची तोडफोड; धमकावत लुटमार