Poladpur : पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सापांचा संचार!

Poladpur: Transmission of snakes in Pitalwadi Primary Health Center!
Poladpur : पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सापांचा संचार!

पोलादपूर येथून ८ किलोमीटर अंतरावर दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेले पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्वार्थाने बेभरवश्याचे असून, विषारी सापांचा मुक्त संचार तेथे असल्याने कर्मचार्‍यांसह उपचारासाठी येणारे रुग्ण आणि नातेवाईक जीव मुठीत धरून वावरत असतात.रुग्णालयाची इमारत कशी असू नये आणि तेथील वातावरण कसे असू नये, हे जाणून घेण्यासाठी पितळवाडीचे आरोग्य केंद्र ‘रोल मॉडेल’ ठरू शकेल. रुग्णालयाची वास्तु अत्याधुनिक आणि सुसज्ज असल्यास रूग्णावर प्रभाव पडून आजार अर्धाअधिक बरा होण्यास मदत होत असते. मात्र येथे तर सगळा आनंदी आनंद आहे. जीर्ण झालेली, कोंदट वातावरण असलेली छोट्या खोल्यांची बैठी इमारत, परिचारिका निवास आणि ठिकठिकाणी सभोवताली ढासळलेली सरंक्षक भिंत, वाढलेली झुडुपे, असे रुग्णाच्या उरात धडकी भरविणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे भीतीदायक वास्तव दिसते. त्यामुळे अशा विदारक परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ. सोपान वाघटकर केंद्रात दर दिवशी येणार्‍या बाह्य आणि आंतर रुग्णांवर वैद्यकीय उपचार करीत आहेत.

वैद्यकीय अधिकार्‍याचे निवासस्थान पूर्ण होत आले असले तरी परिचारिका निवासात राहणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखे आहे. या निवासातील शौचालयात मण्यार, कांडर, फुरसे, नाग अशा अतिविषारी सापांचे बस्तान असून, शौचालयाला दरवाजाही नाही. त्यावर उपाय म्हणून कापडाचा आडोसा करण्यात आला आहे. तसेच संरक्षक भित जागोजागी ढासळलेली असल्याने आरोग्य केंद्रात आणि बाहेरील भागातही सरपटणार्‍या प्राण्यांचा मुक्त संचार दिसून येत असून, सर्वांनाच भीतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त असल्याने पाण्याची समस्या आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात एकमेव शौचालय असून, याचा वापर कर्मचारी, रुग्णांप्रमाणे पितळवाडी बाजारपेठेत आलेली जनताही करीत असल्याने शौचालयाची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य केंद्रात औषधांचाही तुटवडा अधूनमधून होत असल्याने रुग्णांना औषधे बाहेरून आणावी लागतात. मात्र याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पितळवाडी आरोग्य केंद्र परिसरातील देवळे, बोरावळे, गोवेले, साखर उमरठ, मोरसडे, वडघर, आडावळे खुर्द आणि बुद्रुक, कापडे खुर्द आणि बुद्रुक, चांभारगणी खुर्द आणि बुद्रुक, म्हाळुंगे ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या ४५ गावे, वाड्यावस्त्यांमधील जनतेला वरदान ठरले आहे.

येथे प्रसुतीसह किरकोळ आजार आणी सर्पदंश, विंचूदंश, अनेक प्रकारचे अपघात यासह साथीचे रोग यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असतात. त्यामुळे तातडीने उपचार होण्यासाठी शासनाने आधुनिक सोयीसुविधा, पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत साखर आणि उमरठ येथे आरोग्य उप केंद्रे असली तरी ती असून नसल्यासारखी आहेत.

जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे साखर आणि केवनाळे येथे महाकाय दरडी कोसळल्या. त्यात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कित्येकांना जखमी व्हावे लागले. त्यावेळी या गावांना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन मंत्री विजय वेडट्टीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, स्थानिक आमदार भरत गोगावले, तसेच केंद्र आणि राज्य सरकारातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेटी दिल्या. त्यावेळी वाटेवरचे हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनी पाहिले असल्याने या केंद्राला आता उच्च दर्जाच्या सोयी पुरविणे गरजेचे आहे.
-तुकाराम केसरकर, सामाजिक कार्यकर्ता, पितळवाडी

                                                                                          वार्ताहर – बबन शेलार


हे ही वाचा – चंद्रकांत पाटील यांनी घेतली अमित शहांची भेट, राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं?