हवालदार सखाराम भोये यांच्या आत्महत्येस पोलीस निरीक्षक जबाबदार

पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याची आमदार सुनील भुसारा यांची मागणी

Police inspector responsible for constable Sakharam Bhoye suicide case
हवालदार सखाराम भोये यांच्या आत्महत्येस पोलीस निरीक्षक जबाबदार

तुळींज पोलीस ठाण्यातच एका हेड कॉन्स्टेबल सखाराम भोईर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येस दोषी असलेले तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुनील भुसारा यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

तुळींज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्या केबिनमध्ये पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस हवालदार सखाराम भोये आदिवासी समाजाचे होते. तसेच ते अत्यंत प्रामाणिक आणि सरळ स्वभावाचे होते. अशा प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष पोलीस हवालदारास न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे, अशी विनंती आमदार भुसारा यांनी केली आहे.

आत्महत्येपूर्वी काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी तुळींज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारीवर्गासमोर हवालदार सखाराम भोये यांना शिवीगाळ केली तसेच अपमानास्पद वागणूक दिली. अशा अपमानास्पद वागणुकीमुळे पोलीस हवालदार सखाराम भोये हे व्यथित झाले होते. परिणामी त्यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांच्याच केबिनमध्ये जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली, असा आरोप आमदार भुसारा यांनी केला आहे.

पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांची कार्यपद्धती ही भ्रष्ट असून स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी पोलीस ठाण्यातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांना ते नेहमीच त्रास देत असल्याची माहिती आता बाहेर येत आहे. तरी सदरचा विषय हा अत्यंत गंभीर असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करावे व याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमदार भुसारा यांची मागणी आहे.


हेही वाचा – वऱ्हाडात सामील झाले पाहुणे खास, लहान मुलांच्या मदतीने ४२ तोळ सोने केले लंपास