कोरोना चर्चा: पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Prime Minister narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

केंद्र सरकारने देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी येत्या 4 डिसेंबर रोजी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून यावेळी पंतप्रधान दोन्ही सभागृहांच्या सभासदांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

याबाबतची माहिती एका नामांकित वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या ऑनलाईन बैठकीसाठी दोन्ही सभागृहाच्या नेत्यांना शुक्रवारी, ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. संसदीय कार्य मंत्रालयातर्फे सर्वपक्षीय बैठकीसाठी विविध पक्ष व नेत्यांशी संपर्क केला जात असल्याचंही समजतंय.

देशात कोरोना महासाथ आल्यानंतर केंद्र सरकारने कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बोलावलेली ही दुसरी सर्वपक्षीय बैठक ठरेल. या बैठकीस मोदी सरकारमधील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे बडे नेते उपस्थिती लावतील, अशी शक्यता आहे.