भुर्जीपावची गाडी ते लंडनचा व्हिला…

पंचवीस वर्षांत प्रताप सरनाईक यांची डोळे विस्फारणारी प्रगती

नव्वदच्या दशकात डोंबिवली रेल्वे स्टेशनसमोर साधी भुर्जीपावची गाडी चालवणारे प्रताप सरनाईक यांची राजकारणापेक्षाही उद्योगक्षेत्रात झालेली प्रगती थक्क करून सोडणारी आहे. डोंबिवलीतील भुर्जीपावच्या गाडीने प्रताप सरनाईक यांचा उद्योगक्षेत्रात सुरू झालेला प्रवास गेल्या २५ वर्षांत थेट लंडनमध्ये स्वत:च्या मालकीचा बंगला खरेदीपर्यंत पोहोचला.

प्रताप सरनाईक हे मुंबई-ठाण्यातील अत्यंत यशस्वी असे बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. 1990 च्या सुमारास प्रताप सरनाईक हे डोंबिवलीतून ठाण्यामध्ये स्थलांतरित झाले. सुरुवातीला त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी घट्ट मैत्री जमली. सरनाईक यांना बांधकाम व्यवसायामध्ये सुरुवातीपासूनच प्रचंड स्वारस्य होते. तेव्हा डोंबिवलीत टुमदार बंगल्यांचे प्रस्थ होते. त्यावेळी डोंबिवलीतील बिल्डर्स हे बंगले खरेदी करायचे आणि त्याच्यावरती इमारती बांधायचे. प्रताप सरनाईकही डोंबिवलीत अशा बंगल्यांच्या आणि जागांच्या शोधात असायचे की जिथे त्यांना इमारत बांधता येईल. डोंबिवलीतून सुरू झालेला सरनाईक यांचा हा व्यवसाय ते ठाण्यात स्थलांतरित झाल्यावर अधिकच फोफावला. जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांची असलेली घट्ट मैत्री ही त्यावेळी ठाण्यामध्ये ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखली जायची.

आव्हाड यांच्या माध्यमातून सरनाईक यांनी ठाण्यात त्यावेळी बांधकाम व्यवसाय आणि राजकारणात स्वतःचा चांगल्यापैकी जम बसवल्याचे जुने ठाणेकर सांगतात. सरनाईक 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याशी असलेली त्यांची घट्ट मैत्री कामाला आली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच सरनाईक यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत तिकिट मिळवले. त्यामुळेच त्यांचे आव्हाड यांच्याशी असलेले घनिष्ठ मैत्री संपुष्टात आले आणि दोघे वैरी बनले.

या भांडणांमध्ये प्रताप सरनाईक यांनी आमदारकी तर मिळवली. मात्र, जितेंद्र आव्हाड यांचासारखा एक तगडा मित्र गमावला.सुरुवातीला जितेंद्र आव्हाड यांची मैत्री आणि नंतर शिवसेना नेत्यांशी असलेल्या सलगीमुळे प्रताप सरनाईक यांनी व्यवसायात प्रचंड भरारी घेतली. ठाण्यातील बांधकाम व्यवसायात त्यांनी आपले स्थान पक्के केले. त्याचबरोबर मुंबई व परिसरातही त्यांचा बांधकाम व्यवसाय फोफावला. इतकेच नव्हे तर परदेशातही त्यांनी आपला बांधकाम व्यवसाय नेला. नव्वदच्या दशकात डोंबिवलीत साधा भुर्जीपाव चालवणारा काही वर्षातच हजारो कोटी रुपयांचा मालक झाला. प्रताप सरनाईक यांची ही बांधकाम व्यवसायातील आणि उद्योग विश्वातील विस्मयकारक प्रगती अनेकांच्या डोळ्यात भरली. त्यातूनच आज त्यांच्यावर ही वेळ ओढवली, असे त्यांच्या काही समर्थकांचे म्हणणे आहे.