६० हजार विद्यार्थी होणार फिट अ‍ॅण्ड फाईन ; रायगडला मिळणार १२५ टन फोर्टीफाईड तांदूळ

फोर्टीफाईड तांदूळ म्हणजे पौष्टीक तांदूळ.

Raigad to get 125 tonnes of fortified rice
रायगडला मिळणार १२५ टन फोर्टीफाईड तांदूळ

देशात अद्यापही शेती व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय मानला जात असला तरी कुपोषणाचे प्रमाण घटलेले नाही. आवश्यक पोषक तत्त्व त्यांना अन्नातून मिळावीत यासाठी आता फोर्टीफाईड राईस (तांदूळ) चा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांसाठी १२५ टन फोर्टीफाईड तांदूळ लवकरच उपलब्ध होणार आहे.फोर्टीफाईड तांदूळ म्हणजे प्लास्टिकचा तांदूळ आहे. शालेय पोषण आहारात देण्यात येणारा हा तांदूळ भेसळयुक्त आहे. त्यामुळे मुलांना कसा खायला द्यायचा, असा प्रश्न पालकांना पडला आहे. मात्र फोर्टीफाईड तांदूळ हा मुलांच्या आरोग्यसाठी उत्तम असल्याने त्या बाबतीत कोणतेही गैरसमज ठेऊ नका, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

दोन वर्षांपूर्वी उत्तर रायगडमधील काही तालुक्यांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक प्रमाणात होते. विशेष म्हणजे आदिवासी विभागातील मुले कुपोषणाने ग्रस्त होती. जिल्हा प्रशासन, रायगड जिल्हा परिषद, जिल्हा सरकारी रुग्णालय, आरोग्य विभाग यांनी कुपोषित बालकांची शोध मोहीम हाती घेऊन येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले होते. सध्या कोणत्या विभागात अशी कुपोषीत बालके आहेत का, याची माहिती घेण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांतील तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांना फोर्टीफाईड तांदूळ देण्यात येणार आहे. ५० दिवसांसाठी सुमारे १२५ टन फोर्टीफाईड तांदूळ लवकरच जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. त्यांनतर तो विद्यार्थांना देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलीक यांनी दिली.

फोर्टिफाइड तांदूळ म्हणजे काय?

फोर्टीफाईड तांदूळ म्हणजे पौष्टीक तांदूळ. त्यात लोह, व्हिटॅमिन बी-१२, फोलिक अ‍ॅसिडसारख्या पोषक घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. पोषक घटकांच्या मुबलकतेमुळे या तांदळाचे पौष्टीक मूल्य देखील खूप जास्त आहे. या तांदळाचे सेवन केल्यास कुपोषणाला अटकाव होणार आहे.

कसा तयार होतो? 

फोर्टिफाइड तांदळामध्ये आवश्यक सूक्ष्म पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवले जाते. या प्रक्रियेत तांदळाची पोषण गुणवत्ता सुधारली जाते. तांदळामध्ये आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांचे प्रमाण वाढविण्याचा आणि तांदळाची पोषण गुणवत्ता सुधारण्यात येते. लहान मुलांना आणि कुपोषितांना याचा फायदा होईल, असा विश्वास सरकारला आहे.

तांदळाचे फायदे

फोर्टीफाईड तांदूळ हा औषधी अन्न म्हणून उपयोगात आणला जाणार आहे. या तांदळाचे सेवन केल्याने कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे. तांदळामध्ये आढळणारे लोह, जस्त, फोलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आदी शरीराचे पोषण मूल्य वाढवतात. त्याचा वापर केल्याने विशेषतः मुलांच्या आणि महिलांच्या निरोगी आरोग्य विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पालकांमध्ये संभ्रम

फोर्टीफाईड तांदूळ हा पिवळसर रंगाचा आहे. तसेच पाण्यात टाकल्यानंतर काही तांदूळ पाण्यावर तंरगतो. त्यामुळे तो प्लास्टिकचा असल्याची भीती ग्रामीण भागातील पालकांमध्ये आहे. तो तांदूळ मुलांना खायला दिल्यास काही आजार झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी पडलेला आहे.


हे ही वाचा – तेजस ठाकरेंना मुंबईत सापडली दुर्मिळ अंध प्रजाती; नाव ठेवलं…