Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाड एमआयडीसी रस्त्यांवर खड्ड्यांचा पाऊस

महाड एमआयडीसी रस्त्यांवर खड्ड्यांचा पाऊस

जागोजागच्या दुरवस्थेमुळे रस्त्यांना जणू खड्ड्यांची माळ घातली की काय, असे वाटावे इतके विदारक दृश्य सध्या दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांना खड्डे पडून दुतर्फा रानटी रोपे देखील वाढली. त्यातच गटार सफाई न झाल्याने रस्त्यांवर गटारातील पाणी तुंबून राहत असल्याने स्वाभाविक अवजड वाहनांमुळे खड्ड्यांचा आकार देखील वाढला आहे. कोरोना आणि निधीच्या विलंबाचे कारण पुढे करीत एमआयडीसीचे अधिकारी ठेकेदारांना पाठबळ देत असल्याने या रस्त्यांची दुरुस्तीनंतरही पुन्हा चाळण झाली आहे. जागोजागच्या दुरवस्थेमुळे रस्त्यांना जणू खड्ड्यांची माळ घातली की काय, असे वाटावे इतके विदारक दृश्य सध्या दिसत आहे.

एमआयडीसीमधील रस्त्यांवर रासायनिक कंपन्याचा माल घेऊन येणार्‍या अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शिवाय खासगी आणि प्रवासी वाहने यांची देखील वर्दळ असते. नांगलवाडी ते बिरवाडी रस्ता एमआयडीसीच्या ताब्यात आहे. देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी लाखो रुपये खर्च होतात. मात्र या पावसाळ्यात रस्त्यांवर वितभर खोलीचे खड्डे पडले आहेत. माल घेऊन येणारी वाहने कित्येक टन वजनाची असताना त्या क्षमतेचा रस्ता मात्र बनविलेला नाही. यामुळे रस्त्यावर आता खड्डेच खड्डे आहेत.

- Advertisement -

सन २०१६-१७ मध्ये रस्त्यासाठी सुमारे १ कोटीच्या वरती खर्च करण्यात आला आहे. तर सन २०१७-१८ मध्ये देखील जवळपास ८० लक्ष इतका खर्च झाला आहे. अंतर्गत रस्ते दुरुस्ती आणि इतर कामे जैसे थे ठेवून ठेकेदार पैसे उकळतात. मातीने भरले जाणारे खड्डे अवजड वाहनाच्या वजनाने काही तासातच जैसे थे स्थितीत येतात. एमएमए हॉस्पिटल समोरून खड्ड्यांच्या ‘माळे’ला सुरुवात होते. सुदर्शन केमिकलसमोर तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तेथून थेट प्रीव्ही कंपनीपर्यंत बरेच खड्डे आहेत. आपटे ऑरगॅनिकच्या समोर आणि मागील बाजूस असलेला रस्ता पूर्ण बाद झाला आहे. अनेक ठिकाणी मोर्‍या खचल्या आहेत. कोप्रानपासून पुढे अ‍ॅक्वा फार्मपर्यंत देखील मोठे खड्डे पडले आहेत.

महाड-आसनपोई ते बिरवाडी हा मार्ग देखील एमआयडीसीच्या ताब्यात असून, या मार्गाची देखील बिकट अवस्था झाली आहे. आसनपोईजवळ मोरी खचली असून, पुढील भागात किनारा ते बिरवाडी या दरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. बिरवाडीजवळ ढालकाठी हे स्थानिक आमदार भरत गोगावले यांचे निवासस्थान असलेले गाव आहे. यामुळे बिरवाडीमधील रस्ते तरी सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र ऐन पावसाळ्यात या मार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर कायम वाहनांची गर्दी असते. यामुळे बिरवाडी परिसरातील आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची कायम वर्दळ या मार्गावरून असते. या सर्वाना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

एमआयडीसी रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली रोपे तशीच आहेत. गटार सफाईचे देखील तीनतेरा वाजले आहेत. ही गटारे मातीने भरली गेली आहेत. शिवाय यातील पाणी देखील तसेच साचून आहे. काही ठिकाणी हे पाणी रस्त्यावर साचून राहत आहे. गटार सफाई, रानटी रोपे काढणे, खड्डे भरणे इत्यादी कामासाठी ठेकेदार नेमला असताना त्याला दिला जाणारा पैसा जातो, कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार याच रस्त्याने जातात ना?

स्थानिक आमदार भरत गोगावले यांचे निवासस्थान बिरवाडीजवळ खरवली ग्रामपंचायत हद्दीती ढालकाठा येथे आहे. शिवाय हा त्यांचा बालेकिल्ला देखील आहे. औद्योगिक वसाहतीवर त्यांचे वर्चस्व आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समस्या सोडवण्यात गोगावले कायम पुढे असतात. मात्र या रस्त्याच्या बाबतीत ते गप्प का, असा सवाल निर्माण झाला आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा रस्ता खड्ड्यात आहे. अवजड वाहनांच्या क्षमतेचा रस्ता तयार करण्यास ते एमआयडीसीला का भाग पाडत नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे. नव्याने या भागात येणारे नागरिक स्थानिक आमदार या रस्त्याने जातात की नाही, अशी खोचक शंका उपस्थित करीत आहेत.

                                                                                                         – निलेश पवार


हे ही वाचा – OBC Reservation : निवडणुका लांबणार, आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीत एकमत


 

- Advertisement -