घरताज्या घडामोडीठाण्यात युवकांनी साकारली 'राजगडा'ची प्रतिकृती

ठाण्यात युवकांनी साकारली ‘राजगडा’ची प्रतिकृती

Subscribe

स्वराज्याच्या पहिल्या राजधानीची प्रतिकृती

दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याची जुनी परंपरा आहे. सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगातही ही परंपरा कायम असल्याचे यंदाही दिसून येत आहे. दिवाळीचा उत्सव म्हणजे दिपोत्सव. दिवाळीत रांगोळी, कंदील, फटाखे या गोष्टींप्रमाणे दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे गड-किल्ले. दिवाळी म्हटलं की मातीचा किल्ला बनविण्यासाठी लहानग्यांची धडपड सुरू होते. दिवाळीत शाळेला सुट्ट्या लागल्या की किल्ला बनवण्याची लगबग सुरू असे, पण सध्या सिमेंटच्या जंगलात दिवाळीतील हे दृश्य इतिहासजमा होत चालले आहे. दिवाळीची सुट्टी सुरू होताच दगड, माती, मावळे, शिवाजी यांची जमवाजमव करणारे लहानगे दिसेनासे झाले आहेत. मातीचे किल्ले हळूहळू विस्मृतीत जातांना दिसताय. अशा परिस्थितीत बाजारात मिळणार्‍या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किल्ल्यांची मागणी अधिक वाढू लागली आहे.

दरवर्षी ठाण्यातील नौपाडा, घंटाळी, वागळे इस्टेट, किसननगर, खोपट, चरई या जुनी लोकवस्तीत मोठया प्रमाणावर किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येतात. ठाण्यासारख्या मोठ्या शहरात झपाटयाने वाढलेल्या शहरीकरणात माती, दगड आणि जागा मिळणे कठीण झाल्याचे वास्तव आहे. मोठाल्या इमारतींच्या लहानशा जागेत हातांनी मातीचे किल्ले बनवण्याऐवजी बाजारात उपलब्ध असलेले प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे किल्ले खरेदी करून सजवण्याकडे लहान मुलांसह पालकांचा कल अधिक वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत देखील ठाण्यातील खारेगाव येथील काही शिवप्रेमी तरूणांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे.

- Advertisement -

दिवाळीनिमित्त स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा किल्ला

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक किल्यांपैकी एक, स्वराज्याची पहिली राजधानी आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला गडांचा राजा राजगड. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. त्यांच्या पराक्रमाची आणि शौर्याची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले आज महाराष्ट्रात दिमाखात उभे आहेत. त्यांचीच प्रतिकृती साकारत छत्रपतींचे कार्य, इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, याकरता गेल्या २५ वर्षांपासून ठाण्यातील खारेगाव येथील काही तरूण दिवाळीत किल्ले तयार करत आहे. यंदा राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारत त्याकाळच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आजच्या धकाधकीच्या काळात महाराजांचे गड-किल्ले लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दिवाळीत किल्ल्याची प्रतिकृती साकारतो. हे करत असताना लहान मुलांना देखील सोबत घेऊन ही प्रतिकृती साकारली जाते. जेणेकरून लहान मुलांमध्ये किल्ले संवर्धनाची आवड निर्माण होईल.
– तुषार गौरी, एन. जी ग्रुप (सदस्य)

- Advertisement -

हा प्रतिकृती हुबेहूब राजगड किल्ल्यासारखी असून त्यांची उंची ४.५ फुट, लांबी १५ तर रुंदी ८ फुट अशी आहे. तुषार गौरी, शम्मी गौरी, रोहित पाटील, यतिष गौरी, आदर्श गौरी, अक्षय गौरी, राजु फुलोरे, ओम गौरी, प्रफुल्ल पवार, प्रशांत दुधसकर, राहुल गुप्ता, प्रशांत गौरी आणि भागेश गौरी या शिवप्रेमी तरूणांनी राजगडाची प्रतिकृती साकारली आहे. हे सर्व तरूण दिवाळीत ज्या किल्ल्याची प्रतिकृती साकारायची आहे त्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट देतात. यापूर्वी या तरूणांनी पुरंदर, परांडा यासारख्या काही किल्ल्यांची प्रतिकृती साकारून महाराजांचे किल्ले लोकांपर्यंत पोहोचतील या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -