पुण्यातील कोथरुडमध्ये बुधवारी भल्या पहाटे घुसलेल्या रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले होते. जवळपास पाच तासांच्या धावपळीनंतर गव्यावर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाच्या अधिकार्यांना यश आले होते. पण यावेळी रानगवा जखमी झाला होता. त्याच्या तोंडातून रक्त वाहत होते. अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कोथरूड भागात बुधवारी सकाळच्या सुमारास रानगवा नागरिकांना दिसून आल्यानंतर आम्हाला याबाबत माहिती देण्यात आली. आम्ही काही वेळात घटनास्थळी पोहचलो. त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे रानगवा बिथरला. डार्ट मारल्यानंतर त्याची धावाधाव झाल्यामुळे घाबरून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकणार आहे, अशी माहिती वन अधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.
पुण्यामधील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीमधील नागरिकांसाठी बुधवारची सकाळ आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. या सोसायटीमध्ये सकाळच्या सुमारास रानगवा दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. गव्याला पकडताना वन खात्याच्या अधिकार्यांची चांगलीच धावपळ झाली.
सकाळी साडेअकराच्या सुमारास वन अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते. तोपर्यंत गवा उजवी भुसारी कॉलनीमधील एका सोसायटीमधील पार्किंगमध्ये शिरला होता. लोकवस्तीमध्ये शिरल्याने काही ठिकाणी धडक दिल्याने गव्याच्या तोंडाला काही प्रमाणात दुखापत झाली होती. वन अधिकारी या गव्याचा पाठलाग करत असतानाच तो पौड रोड वरील मुख्य रस्त्यावर पोहचला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला पाहण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती.
वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी दोरीच्या मदतीने पकडण्याचे प्रयत्न केले. दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले. तरी देखील वन कर्मचार्याच्या अधिकार्यांना गव्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. गवा अधिकार्यांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हता. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वन अधिकार्यांना यश आले होते. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.