घरताज्या घडामोडीमुरुडच्या सुपारीला विक्रमी भाव; तालुक्यातील उत्पादक खूश

मुरुडच्या सुपारीला विक्रमी भाव; तालुक्यातील उत्पादक खूश

Subscribe

२ हजाराची घसघशीत वाढ करून विक्रमी भाव मिळवून दिल्याने ऐन गणेशोत्सवात बागायतदार खुश झाले आहेत.

मुरुड तालुक्यातील शेकडो नारळ सुपारी बागायतदारांना चक्रीवादळाचा अस्मानी संकटाचा फटका बसल्यानंतर त्यांच्या तालुका सुपारी खरेदी व विक्री संघाने यावर्षीच्या असोली सुपारीला मागच्या वर्षीपेक्षा दर मणास जवळपास २ हजाराची घसघशीत वाढ करून विक्रमी भाव मिळवून दिल्याने ऐन गणेशोत्सवात बागायतदार खुश झाले आहेत. सन २०१९ मध्ये एक मण (२० किलोग्रॅम) असोली सुपारीला ४ हजार १२० रुपये इतका भाव लागला होता. परंतु यावर्षी तो ६ हजार ४०० दर मणास इतका विक्रमी लागला आहे. सुपारी संघाच्या असोली सुपारी हिशोबाची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच संघाच्या सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्ष महेश भगत यांनी हा दर जाहीर केल्याने बागायतदारांनी आनंद व्यक्त केला. घराघरात धार्मिक कार्यासाठी, तसेच सुगंधी सुपारी, कलर टॅनिंग, खायच्या पानांमध्ये आणि मुखवासासाठी वापरल्या जाणाऱ्या या बहुउपयोगी सुपारीचे माहेरघर, तसेच श्रीवर्धनी रोठा म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोकण किनारपट्टीवरील मुरुड तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना १७ सप्टेंबर १९३८ साली सहकार तत्वावर करण्यात आली.

त्याचा उद्देशच खासगी व्यापाऱ्यांकडून कमी भावात सुपारी खरेदी करणे, वजनातील फसवणूक या बाबी टाळण्यासाठी सुपारी बागायतदारांना संघटित करणे असा होता. लवकरच शतकाकडे वाटचाल करणाऱ्या संघाची आता कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल होत असून, शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असते. मुरुड तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र ४५० हेक्टर असले तरी उत्पादन क्षेत्र ३९९ हेक्टर इतके आहे. मुरुडसह आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, चिकणी, भोईघर, काकळघर, मांडला आदी ठिकाणी सुपारी पिकवली जाते. गत वर्षी ७२५ खंडी (१ खंडी म्हणजे ४०० किलोग्रॅम) सुपारीचे माप सभासदांनी संघात घातले होते. तर या वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळात सुपारीची असंख्य झाडे जमीनदोस्त झाल्याने निम्मेच म्हणजे ३७५ खंडीचे माप संघात पडले आहे.

- Advertisement -

पूर्वी सदर सुपारी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवली जात असे. तेथील व्यापारी भावासंदर्भात कुचंबणा करीत असत. संघाला त्यांना साडेसहा टक्के दलाली द्यावी लागत असल्यामुळे भाव चांगला देता येत नव्हता. परंतु संघाने आपली वेबसाईट तयार केल्याने गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद येथील प्रक्रिया करणारे व्यापारी संघाला लाभले. त्यामुळे बागायतदार ते थेट व्यापारी अशा संबंधामुळे दलाली वाचल्याचा फायदा बागायतदारांना झाला असल्याचे अध्यक्ष भगत यांनी यावेळी स्पष्ट केले. सभेला सर्व संचालक आणि बागायतदार सभासद उपस्थित होते.


हे ही वाचा – शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करणार, राजेश टोपेंची माहिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -