ठाण्यातील ‘हा’ रस्ता झाला धोकादायक; वाहतूक केली बंद

road damage in vartak nagar at thane
ठाण्यातील 'हा' रस्ता झाला धोकादायक; वाहतूक केली बंद

ठाणे येथील कोपरी पूर्व, बारा बंगाल येथे मलनिस्सारण दुरुस्तीचे काम करताना रस्ताखालील माती घसरल्याने तो रस्ता धोकादायक झाल्याची घटना ताजी असताना, शनिवारी रात्री वर्तकनगर नाक्यावरील नाल्यावरून जाणारा रस्ता खचल्याची घटना घडली. तो रस्ताही धोकादायक झाल्याने वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तसेच तो रस्ता नाल्यावरूनच असल्याने त्याचे काम रविवारीच सुरू होण्याची शक्यता महापालिका सूत्रांनी वर्तवली आहे.

कोपरी पूर्व येथे रस्त्याखालील माती घसरण्यापूर्वी पावसाळ्यातच लोकमान्य नगर परिसरात रस्त्याच्या मधोमध असाच खड्डा पडला होता. त्यावेळीही वाहतुकीचे या परिसरात तीन तेरा वाजले होते. त्यानंतर शनिवारी रात्री अचानक नाल्यावरील रस्त्याला तीन ते चार फुटांचा खड्डा पडल्याने तो रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. सद्यस्थितीत त्या खड्ड्याच्या आजूबाजूला बॅरिकेट लावण्यात आले आहे. तो मुख्य रस्त्यावरून सावरकर नगर, लोकमान्य नगर, यशोधन नगर आदी परिसरात जाणारा असल्याने त्या रस्त्यावरील वाहतूक बंद केल्याने पुन्हा एकदा वाहतुकीचे या परिसरात तीन तेरा वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेत, कोणालाही दुखापत झाली नसून वेळीच हा प्रकार समोर आल्याने मोठी दुर्घटना होताना वाचली. एकीकडे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरील राजकीय वातावरण तापले असताना, या खड्ड्यामुळे पुन्हा स्थानिक पातळीवर लोकमान्य नगर येथील पडलेल्या खड्डयांप्रमाणे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हेही वाचा – Thane School Reopen: ठाणे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील