संजीव जयस्वाल यांची कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अध्यक्षपदी नियुक्ती

Sanjeev Jaiswal appointed as Chairman, Kalyan-Dombivali Smart City Development Corporation
संजीव जयस्वाल यांची कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांची, ‘कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागरी विकासाबाबत संजीव जयस्वाल यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे मुंबईचे अतिरिक्त आयुक्त पदासोबत ही नवीन जबाबदारी देखील महाराष्ट्र राज्य शासनाने सोपविली आहे. कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान हे भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी संजीव जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत स्मार्ट सिटी चॅलेंजसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १० संभाव्य स्मार्ट शहरांसाठी शासन स्तरावरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संबंधित शहरांचे मार्गदर्शक म्हणून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कामकाज पाहतात.

कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष यू. पी. एस. मदान हे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्तीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शासनाच्या विचाराधीन होता. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा नागरी विकासामधील दांडगा अनुभव लक्षात घेता राज्य शासनाने कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडवर जयस्वाल यांची संचालकपदी नियुक्त करुन त्यांच्याकडे अध्यक्षपदाची देखील धुरा सोपविली आहे.


हेही वाचा – बापरे! कूपर रुग्णालयातील ज्वालाग्राही सॅनिटायझरच्या साठ्याच्या ठिकाणी महापौरांची बैठक