Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी जे चिरकाल राहते तेच खरे सत्य

जे चिरकाल राहते तेच खरे सत्य

Subscribe

आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही, तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानीत असतो. जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय. आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडीत नाही. त्याचप्रमाणे, आपण विषयसुख सोडीत नाही, याला काय करावे? जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषयसुखाचा त्याग करतात; आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते.

आपले समाधान का बिघडते? आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून! जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही; त्याचप्रमाणे या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहात नाही; म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून, सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते. म्हणून, आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे. आपण ज्या कार्यासाठी आलो, ते कार्य झाले की समाधान होते. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत, आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे? आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे.

- Advertisement -

जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे, त्याचे गुणवर्णन ऐकावे, त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन राहावे. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते. म्हणून नामच सर्वस्व मानावे. नामात काय आहे हे, ते घेतल्यानेच सर्व काही कळून येते. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -