घरताज्या घडामोडीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जे हे वडील सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेंकुलें । घडलें आम्हां //
आमचे जे हे सर्व पूज्य वडील त्यांच्याकडे त्यांना मारण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांना पाहिले, हे काय आम्हांकडून लहानसहान पातक घडले? सांगा बरे.
आतां यावरी जें जियावें | तयापासूनि हें बरवें | जे शस्त्र सांडूनि साहावे | बाण यांचे //
तर आता या उपर जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्रे टाकून देऊन त्यांचे वार सहन करणेच फार उत्तम.
तयावरी होय जितुकें | तें मरणही वरी निकें | परी येणें कल्मषें। चाड नाहीं //
असे केल्यामुळे जरी मरण प्राप्त झाले, तरी ते चांगले; परंतु यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही.
ऐसें देखून सकळ | अर्जुनें आपुलें कुळ | मग म्हणे राज्य तें केवळ। निरयभोगु //
याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुल पाहून म्हटले की, यांना मारून राज्य मिळविणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होय.
ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें //
संजय म्हणाला:- राजा धृतराष्ट्रा, ऐक त्या समरांगणात अर्जुन असे बोलला.
मग अत्यंत उद्वेगला | न धरत गहिंवरु आला | तेथ उडी घातली खालां । रथौनियां //
आणि मग अत्यंत उदासीन झाला व अनिवार दुःखी होऊन त्याने रथातून उडी टाकली.
जैसा राजकुमरु पदच्युतु | सर्वथा होय उपहतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु //
ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो जसा सर्वथा निस्तेज होतो किंवा राहूच्या योगाने सूर्यास ग्रहण लागले म्हणजे तो कलाहीन होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -