घरताज्या घडामोडीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥
असा जो स्वधर्माचे आचरण न करणारा, श्रीमंतीचा ज्याला ताठा भरला आहे आणि जो केवळ विषयासक्त झाला आहे,
तया मग अपावो थोर आहे । जेणें तें हातीचें सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥
त्याच्यावर मोठी संकटे येतात. त्या योगाने जवळ असलेले ऐश्वर्य नाहीसे होते आणि असलेले भोगसुद्धा भोगवत नाहीत.
जैसें गतायुषी शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां निदैवाच्या घरीं । न राहे लक्ष्मी ॥
ज्याप्रमाणे, आयुष्य संपलेल्या शरीरात जीव राहत नाही किंवा करंट्याचे घरी लक्ष्मी राहात नाही.
तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवें हरपला । प्रकाश जाय ॥
त्याप्रमाणे, स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले म्हणून समजावे. दीप मालवताक्षणीच जसा प्रकाश नाहीसा होतो, तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हें फुडें । विरंचि म्हणे ॥
त्याप्रमाणे, ब्रह्मदेव म्हणतो,‘प्रजाजनहो! जो आपापल्या वर्णाश्रम धर्माचे आचरण सोडतो, त्याचे स्वातंत्र्य खरोखर नष्ट होते.
म्हणौनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील । चोरु म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचें ॥
म्हणून, स्वधर्माचा जो त्याग करील, त्याला काळ शिक्षा करील आणि हा चोर आहे असे समजून त्याच्या सर्वस्वाचे हरण करील.
मग सकळ दोषु भंवते । गिंवसोनि घेती तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैसीं ॥
मग रात्र झाल्यावर स्मशानाला जशी भूते वेढतात, तशी सर्व संकटे त्याच्याजवळ येऊन त्याला वेढतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -