घरताज्या घडामोडीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिंवशीं । धर्मासीं नीतीशीं । शेंस भरीं ॥
दैत्याच्या अधर्मीयांच्या कुळाचा नाश करतो व साधूना योग्य मान देववितो आणि धर्म व नीति यांची ओटी भरतो (गाठ घालतो.)
मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं । तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥
अविचाररूप काजळी काढून विचाररूप दिवा प्रज्वलित करतो, ज्या वेळी योगी लोकांना निरंतर आनंदाची दिवाळी भासते.
सुत्सुखें विश्व कोंदे । धर्मुचि जगीं नांदे । भक्तां निघती दोंदें । सात्त्विकाचीं ॥
मग सत्सुखाने सर्व विश्व भरून जाते, जिकडेतिकडे लोक धर्माचे आचरण करतात आणि भक्तजन सत्त्वगुणाने परिपूर्ण होतात.
तैं पापांचा अचळु फिटे । पुण्याची पहांट फुटे । जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥
अर्जुना, ज्या वेळी माझा अवतार प्रकट होतो, त्या वेळी पापांचे पर्वत नाहीसे होतात व पुण्याचा उदय होतो.
ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं । परि हेंचि वोळखे जो जगीं । तो विवेकिया ॥
अशा कामाकरिता मी युगायुगांचे ठायी अवतार धारण करतो. परंतु असे जो ओळखतो, तोच जगात विचारवान होय.
माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें । हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥
माझे अजत्व कायम असून जन्म घेणे व अकर्तृत्व कायम असून कर्म करणे असे जे माझे निर्विकार स्वरूप, ते जो नि:शंक जाणतो, तोच परममुक्त होय.
तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा नाकळे । मग पंचत्वीं तंव मिळे । माझ्याचि रूपीं ॥
असे जाणणारा देहाच्या संबंधाने जरी चालतो असा दिसला तरी तो चालत नाही; आणि त्याने देह धारण केला, तरी तो देहभावाने आकळिला जात नाही; मग मेल्यावर माझ्या स्वरूपात येऊन मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -