कोरोनाचा पुन्‍हा उद्रेक!

coronavirus

मुंबई, ठाण्यातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच

येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसेच ठाण्यातील शाळाही बंद ठेवण्याचा आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबई आणि ठाण्यातील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे वगळता राज्यातील इतर भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा असा आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आह

राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.

येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दिल्लीतील परिस्थिती पाहता 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. याबाबतचे परिपत्रक पालिकेकडून जारी केले जाणार आहे.

अहमदाबादेत ५७ तासांचा कर्फ्यू
गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कहर सुरुच आहे. राज्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या अहमदाबादमध्ये दिवाळीनंतर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अहमदाबाद येथील स्थानिक प्रशासनाने 20 नोव्हेंबर रोजी रात्रीपासून 57 तासांचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतलाय. हा कर्फ्यू 20 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता सुरु होईल आणि 23 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता संपेल. अहमदाबादमध्ये 57 तासांच्या कर्फ्यूदरम्यान केवळ दूध आणि औषधे यांचीच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. गुजरात सरकारचा 3 नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय देखील पुढे ढकलण्यात आलाय. 57 तासांच्या कर्फ्यूची घोषणा झाल्यानंतर अहमदाबादमधील कालुपूर मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. नागरिक कोणत्याही खबरदारीशिवाय खरेदी करताना दिसले.

दिल्ली-मुंबई विमान, रेल्वेही बंद करणार?

लॉकडाऊननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत कोरोनाची लाट आली आहे. दिल्लीत मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत असून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग दिल्लीबाहेरही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली-मुंबई विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे वृत्त आहे. दिवाळीच्या आधीच दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली होती.

गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचारही राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र सरकारकडून लवकरच काढण्यात येतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत मागील २४ तासात तब्बल ७ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २८ ऑक्टोबरपासून दिल्लीत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिल्लीत सुरुवातीला एकाच दिवसात ५ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणार्‍या रुग्णसंख्येने ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

नाशकात शाळा २३ पासून सुरू

आठ मन्यिांनंतर सोमवारपासून शाळा सुरू होत असून शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व शिक्षकांच्या कोविड चाचण्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. तसेच कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1324 शाळा 100 टक्के सुरू करण्यात येणार आहेत.

त्यासाठी 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांच्या अँटीजन तपासण्या करणे अनिवार्य असून काही प्रमाणात लक्षणे असलेल्या शिक्षणकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात यावी. शाळांमध्ये पालकांच्या लेखी संमतीने 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याने शाळांची स्वच्छता, नियमित सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर या गोष्टी पालन करण्यात याव्यात. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील देखील शाळा सुरू होणार असल्याने या भागातही कोविडबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होईल यासाठी नोडल अधिकारी व सर्व संबंधित शाळांनी लक्ष देणे आवश्यक आहे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

शाळा सुरू होण्याच्या पहिल्या टप्प्यात इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय प्रत्यक्षपणे शाळेत शिकवण्यात येणार असून उर्वरित विषय ऑनलाईन पद्धतीनेच शिकवण्यात येणार आहेत. याचसोबत पालकांच्या मागणीनुसार वाहतूक व्यवस्था पुरविण्यासाठी आवश्यकतेनुसार परिवहन विभागाची मदत घेण्यात येणार आहे.

कोविड विषाणूच्या अनुषंगाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्षपणे सुरू करण्यासाठी 10 नोव्हेंबर 2020 रोजीच्या परिपत्रकातील सुचनांच्या अधिन राहून शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वरील वर्ग सुरळीतपणे सुरू करण्यासाठी महानगरपालिका हद्द वगळून उर्वरीत नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी प्रशासन अधिकारी (शिक्षण) सुनीता धनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोनिया, राहुल गांधींनी दिल्ली सोडली
दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांनी दिल्ली शहर सोडले आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पणजी विमानतळावर येत आता पुढचे काही दिवस ते गोव्यात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनिया गांधी यांना शहर काही दिवसांसाठी सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र खासदार राहुल गांधी हे गोव्यात दाखल झाले आहेत. पुढचे काही दिवस या दोघांचाही मुक्काम गोव्यात असणार आहे.

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या
शाळा सुरु होणार असल्याने मुंबई विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्‍यांची वार्डनिहाय अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. शिक्षकांसोबतच सुरक्षा रक्षक, क्लार्क आणि सफाई कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही चाचणी होत आहे. मुंबईत राहणार्‍या शिक्षकांना त्यांच्या घराजवळील आरोग्य केंद्रावर ही चाचणी करता येणार आहे. यावेळी शिक्षकांकडे आधारकार्ड आणि शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे असणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात इयत्ता नववी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

महाराष्ट्रातही वाढ
राज्यातही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मागील आठवड्यात दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. मागील दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १८ नोव्हेंबर रोजी राज्यात ५ हजार रुग्ण आढळून आले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजीही ५ हजार ५३५ रुग्ण एक दिवसात आढळून आले.

पंढरपूरात दिंड्या, पालख्यांना बंदी
राज्य शासनाने विविध जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नका, असे आदेश दिले आहेत. कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कार्तिकी एकादशीला वारकर्‍यांना पंढरपूरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. यंदाची कार्तिकी एकादशी 26 नोव्हेंबरला आहे, मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे. कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात. राज्य शासनाने या सर्व सोहळ्यांना बंदी घातली आहे.