Mahad : महाड औद्योगिक वसाहतीत गचाळ गटार व्यवस्था

  ३४ किलोमीटर रस्त्याकरिता ६ किलोमीटरचे गटार

Sewage system in Mahad Industrial Estate
Mahad : महाड औद्योगिक वसाहतीत गचाळ गटार व्यवस्था

महाड येथील औद्योगिक क्षेत्रात ३४ किलोमीटर रस्त्याला अवघी ६ ते ७ किलोमीटर लांबीची पक्की गटारे आहेत. मात्र या गटारांची अवस्था देखील गचाळ असून, यामध्ये पाणी तुंबून राहत आहे. कारखान्यांना देण्यात येणार्‍या सुविधांकडे एमआयडीसी दुर्लक्ष करीत असल्याने सातत्याने प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे अनेक छोटे कारखाने हे औद्योगिक क्षेत्र सोडण्याच्या मार्गावर आहेत.

या भागात ऐन पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर येते. पावसाळ्यापूर्वी केली जाणारी गटार स्वच्छता नियोजनबद्ध केली जात नसून आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक भागात पक्की गटार व्यवस्था नसल्याने औद्योगिक क्षेत्रातील जवळपास ९० टक्के नाले पाण्याने तुंबले आहेत. शिवाय यामध्ये गवत उगविल्याने आणि कचरा साचल्याने पाणी सहजरित्या वाहून जात नाही. औद्योगिक वसाहत उभी राहून चाळीस वर्षे उलटली तरी अद्याप या परिसरात योग्य नियोजन केले गेले नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारे नाहीत. यामुळे पाणी तुंबून राहण्याचे प्रमाण वाढत आहे. कारखान्यांचा कचरा देखील सरंक्षण भिंतीबाहेर पडत आहे. हा कचरा उचलण्यासाठी किंवा कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने कचरा देखील गटारात पडून राहत आहे.

औद्योगिक परिसर हा नांगलवाडी गावापासून थेट आमशेत गावापर्यंत वसला आहे. या दरम्यान किमान सात ते आठ ग्रामपंचायती आहेत. या परिसरात नवनवीन उद्योग प्रतिवर्षी उभे राहत आहेत. या नव्या कारखान्यांचे सांडपाणी जरी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जात असले तरी पावसाचे पाणी आणि इतर दैनंदिन वापरातील पाणी याच गटारात येत आहे. गटार व्यवस्था बांधीव नसल्याने त्यातील पाणी कायम रस्त्यावर येते. याकरिता पक्की बांधीव गटारे असणे आवश्यक आहे. मात्र केवळ ६ ते ७ किलोमीटर अंतरातच बांधीव गटार आहेत. उर्वरित ठिकाणी गटारांची अवस्था बिकट आहे. यामुळे कारखान्यांतील पाणी बाहेर पडल्यास गटारातून साचून राहत आहे.

रासायनिक सांडपाणी असल्याने या पाण्याला उन्हाळ्यात उग्र वास आणि रंग निर्माण होतो. रस्त्याकडेला असलेल्या गटारातून साचलेले पाणी बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी एमआयडीसीची असली तरी या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी?

औद्योगिक क्षेत्रात सद्यःस्थितीत बडे मासे छोट्या माश्यांना गिळण्याचे काम करीत आहेत. रासानिक प्रदूषणाला छोट्या कारखानदारांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. शिवाय गटारात बाहेरून आलेले पाणी देखील उचलण्याची सक्ती केली जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रदूषणाला देखील एक बड्या कारखान्याच्या नावाची चर्चा सुरू असतानाच प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीने छोट्या कारखानदारांना नोटीस बजाविल्या आहेत. यापैकी ज्या कारखान्याचे पाणी सरंक्षक भिंतीच्या बाहेर जाते ते शेजारील कारखान्याने सीसीटीव्हीच्या आधारे दाखवून दिले त्याच कारखान्याला नोटीस बजावून अडकविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शिवाय ज्या कारखान्याचे पाणी बाहेर पडून त्रास होतोय त्या कारखान्याकडे पत्रव्यवहार केल्याचे दाखविले. ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्य करून देखील चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे.

वार्ताहर – निलेश पवार


हे ही वाचा – डम्पर-कार अपघातात नाशिकचे डॉ. ज्ञानेश्वर महाजन यांचा मृत्यू