डोंबिवलीत शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग

डोंबिवली मधील खंबाळपाड्यातील परिसरात असलेल्या शक्ती प्रोसेस कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली मधील खंबाळ पाड्यातील परिसरात असलेल्या शक्ती प्रोसेस कंपनीला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने प्रचंड धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कंपनीच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता. आग लागल्याची घटना समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. या आगीत संपूर्ण कंपनी जाळून खाक झाली असून अग्निशमन दलाच्या चार तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून आगीचे कारण अद्याप कळून येत नसल्यची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. ९ डिसेंबर रोजी कल्याण शीळ रोड येथे एका गोदामाला आग लागली होती. दरम्यान, या महिनाभरात आगीची ही दुसरी घटना आहे. डोंबिवलीत वारंवार लागणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आगीचे कारण अस्पष्ट

डोंबिवली पूर्व एमआयडीसी ९० फुटी रोड खंबाळ पाडा या ठिकाणी असलेली शक्ती प्रोसेस या कंपनीला शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रोद्ररूप धारण करून संपूर्ण कंपनीला आगीने आपल्या वेढ्यात घेतले. या आगीचे वृत्त कळताच एमआयडीचे आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे चार फायर इंजन आणि २ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. चार तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानाना यश आले आहे. शुक्रवार असल्यामुळे एमआयडीसी परिसर बंद असल्याकारणाने शक्ती प्रोसेस ही कंपनीला सुट्टी असल्यामुळे आतमध्ये मेंटनेस विभागाचे कर्मचारी सोडून सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कंपनीच्या आत मेंटनन्सचे कामे सुरु असल्यामुळे कदाचित ही आग लागली असावी असा अदांज वर्तवण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप कळून आलेले नसून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

डोंबिवलीत या महिन्यातील आगीची ही दुसरी घटना असून ९ डिसेंबर रोजी कल्याण शिळ रोडवरील सोनारपाडा येथे गोदामाला भीषण आग लागली होती. याआगीत देखील कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नव्हती. डोंबिवली एमआयडीसीत असणाऱ्या कंपन्या, गोदाम या ठिकाणी मालकाकडून कुठल्याही प्रकारची दक्षता घेण्यात येत नसल्यामुळे वारंवार लागणाऱ्या आगीमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.


हेही वाचा – काँग्रेसमध्ये बदलाचे जोरदार वारे; राज्यात संघटनात्मक पातळीवरही मोठे बदल होणार?