घरसंपादकीयओपेडशरद पवारांचा राजीनामा आणि सैल झालेली वज्रमूठ!

शरद पवारांचा राजीनामा आणि सैल झालेली वज्रमूठ!

Subscribe

महाराष्ट्राचे राजकारण हे शरद पवार या एका नावाभोवती फिरते हे गेल्या तीन दिवसांत पुन्हा एकदा दिसून आले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा त्याग करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर राज्यात होऊ घातलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विविध कारणे सांगून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या सभा पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे, पण पवारांच्या राजीनाम्यामुळे ही वज्रमूठ अधिक सैल झाली हे नाकारता येणार नाही.

उन्मेष खंडाळे | महाविकास आघाडीची १ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर वज्रमूठ सभा झाली. या सभेला मिळालेला प्रतिसाद हा शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना नवी ऊर्जा देणारा होता. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झालेली ही सभा होती. आदित्य ठाकरेंपासून नाना पटोले, अशोक चव्हाण, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनीही मुंबई महापालिकेच्या ठेवींवर भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोळा असल्याचा घणाघात केला. या सभेने वाढलेला मविआचा टेम्पो अवघ्या काही तासांत शरद पवारांनी खाली आणला. नुसताच खाली नाही आणला, तर यापुढे वज्रमूठ सभा होणार की नाही? महाविकास आघाडी फुटणार का? इथपर्यंत या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन या सभेच्या दुसर्‍या दिवशी अर्थात 2 मे रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राजकीय भूकंप केला. पवारांनी 1 मे 1960 पासून मी राजकीय जीवनात आहे. सलग 56 वर्षे विधानसभा, लोकसभा, राज्यसभेचा सदस्य राहिलो आहे. राज्यसभेची तीन वर्षे अजून शिल्लक आहेत, पण आजच मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा शरद पवारांनी केली. पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने अनेकांची कोंडी झाली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आली. यात सर्वात मोठा रोल हा शरद पवारांचा होता. त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीमध्येही त्यांनी ‘महाविकास आघाडीची जुळणी’ हे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे, मात्र आता ही महाविकास आघाडी टिकेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे तो पवारांच्या राजकीय निवृत्तीच्या घोषणेमुळे. महाविकास आघाडीच्या 3 वज्रमूठ सभा आतापर्यंत झाल्या आहेत. त्या मराठवाडा, विदर्भ आणि तिसरी मुंबईत झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला पहिली वज्रमूठ सभा झाली. सांस्कृतिक मैदानावर झालेल्या या सभेत तिन्ही पक्षांचे झेंडे आणि नेतेही दिसले.

दुसरी वज्रमूठ सभा काँग्रेसचा प्रभाव असलेल्या विदर्भात झाली. 16 एप्रिल रोजी नागपूरमध्ये झालेल्या वज्रमूठ सभेलाही मोठा प्रतिसाद मिळाला, तर मुंबईत 1 मे रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचा मुहूर्त साधत झालेल्या सभेलाही मुंबईकरांनी भरगच्च गर्दी केली होती. सभेसाठी छोटे मैदान निवडण्यात आले आहे. तेही भरणार की नाही, अशी टीका विरोधकांकडून होत होती, मात्र या सर्व टीकेला सभेच्या गर्दीनेच उत्तर दिले. या सभेला झालेली गर्दीच मुंबई महापालिकेचा निकाल ठरवणारी असल्याचे शिवसेनेचे (ठाकरे गट) अनेक नेते बोलत होते.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या आगामी वज्रमूठ सभा पुढील टप्प्यात कोल्हापूर, नाशिक व पुणे या राज्यातील प्रमुख शहरात नियोजित होत्या, मात्र या सभा आता रद्द करण्यात आल्या आहेत. तिसर्‍या टप्प्यात अमरावती, सोलापूर, जळगाव या ठिकाणी सभा होणार होत्या, मात्र आता या सभा स्थगित केल्याचे सांगितले जात आहे. नाना पटोले हे राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे सभा स्थगित झाल्याचं सांगत आहेत. पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळाल्यानंतर पुढचे पाहू, अशी सावध भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

उद्धव ठाकरेंनी मात्र स्पष्ट सांगितले आहे की, वज्रमूठ सभा या मे महिना आणि जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत घेण्याचं नियोजन होतं. त्यासाठी मीच पुढाकार घेतला होता, मात्र या सभा संध्याकाळी जरी घेतल्या जात असल्या तरी दुपारपासून लोक येत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी जे काही घडलं, त्या पार्श्वभूमीवर सभा सुरू ठेवणं योग्य ठरलं नसतं. उद्धव ठाकरेंनीच आता वज्रमूठ सभा होणार नसल्याचं सांगितल्यामुळे या सभांसोबतच महाविकास आघाडीचे काय होणार, असाही प्रश्न निर्माण होत आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत 2019 पासून निर्माण होत असलेली दरी हे आमच्यासाठी शुभ संकेत होते, असे पवारांनी पुस्तकात म्हटले आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली यावर शरद पवारांनी पुस्तकात प्रकाश टाकला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईने ३० वर्षांपासूनची युती संपुष्टात आली आणि येथूनच महाविकास आघाडीचा प्रयोग सुरू झाला, तो इतिहास सर्वज्ञात आहे.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक आघाडीने जिंकली. शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या विजयी झाल्या. यानंतर महाविकास आघाडीने एकत्रित लढलेली महत्त्वाची निवडणूक म्हणजे विधान परिषदेची. 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोकण शिक्षण परिषद सोडल्यास एकही जागा भारतीय जनता पक्षाला जिंकता आली नाही. नाशिकमध्ये अपक्ष सत्यजीत तांबेंचा विजय झाला, तर मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, अमरावती आणि नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला मिळणारा जनतेचा पाठिंबा हा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत होते. पुण्यात झालेल्या दोन पोटनिवडणुकांत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला भाजपने तिकीट दिले होते, तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. येथेही तिन्ही पक्षांची एकी दिसून आली.

भाजप आणि शिंदे गटाने कसब्यात तळ ठोकला असला तरीही ही जागा महाविकास आघाडीने भाजपकडून खेचून आणली. यानंतर महाविकास आघाडीकडून स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबईसह इतर महापालिका निवडणुका लवकर घेण्याची मागणी होऊ लागली, मात्र भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचे निष्कर्ष येत होते. यामुळेच या निवडणुका टाळल्या जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या कारभारावर टीका करणार्‍या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा एप्रिलपासून राज्यात सुरू झाल्या आणि हा पाठिंबा अधिक वाढत असल्याचेही वातावरण निर्माण होऊ लागले. त्यातच आता पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा त्याग आणि कोणतेही राजकीय पद न स्वीकारण्याचा निर्णय जाहीर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही कोड्यात टाकले आहे. महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना आणि काँग्रेस या दोन ध्रुवांना एकत्र करणारे राजकीय नेतेच जर राजकारणातून बाजूला जाणार असतील तर आगामी काळात या आघाडीची बांधलेली वज्रमूठ किती दिवस घट्ट राहणार हा सवाल शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांना सतावत आहे.

आघाडीमध्ये सावरकरांच्या मुद्यावरून बिघाडी होण्याची शक्यता होती. संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेतच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरून त्यांना सुनावले होते. यापुढे सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, अशी भूमिका ठाकरेंनी घेतली. सावरकरांच्या मुद्यावर ही आघाडी फुटते का असे वाटत असताना शरद पवारांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन या वादावर पांघरूण घातले. त्यानंतर सावरकरांवरून सुरू असलेला वाद शांत झाला. या आघाडीमध्ये पवार हे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. त्यांनीच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला एकत्र बांधून ठेवले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. कर्नाटक विधानसभेची येत्या 10 मे रोजी निवडणूक आहे. या निवडणुकीत काँग्रेस हा गेमचेंजर पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आहे. पुढच्या वर्षी याच महिन्यात लोकसभेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. बरोबर त्याच्या एक वर्ष आधी पवारांनी राजकीय संन्यासाची घोषणा करून महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात धडकी भरली आहे.

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा हा फक्त त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आता राहिलेला नाही. त्यांच्या राजकीय निर्णयाने देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सुप्रिया सुळे यांना फोन करून पवारांनी हा निर्णय बदलावा, असे म्हटले आहे. यावरूनच त्यांचे राजकारणात राहणे हे फक्त त्यांच्या पक्षासाठीच नाही, तर विरोधी पक्षांसाठीही महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Unmesh Khandale
Unmesh Khandalehttps://www.mymahanagar.com/author/unmesh/
मागील १५ वर्षांपासून पत्रकारितेत. राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवरील सामाजिक, राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -