आमंत्रण नसताना भाजपच्या कार्यक्रमात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची उपस्थिती!

shrikant shinde in bjp program
श्रीकांत शिंदेंनी भाजपच्या कार्यक्रमात लावली उपस्थिती!

कल्याणमध्ये भाजपच्या कार्यक्रमात जाऊन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ‘आता सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढयला नको’ असे वक्तव्य केल्याने आता एकच चर्चा रंगू लागली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये हे युतीचे संकेत तर नाहीत ना? असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे. पत्रिपुलाजवळील पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाचे आज नामकरण करण्यात आले. सदर कार्यक्रम भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला डोंबिवली भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या येथूनच खासदार शिंदे हे जात होते. त्यांनी आपली गाडी थांबवत कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली.

भाजपच्या या कार्यक्रमामध्ये खरे तर खासदार शिंदे यांना निमंत्रण नव्हते. तरीही थेट त्यांनी गाडीतून उतरून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी स्थानिक नागरिकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना संबोधताना आता कितीही सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढयला नको असे वक्तव्य केले. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये परत युती होते का? अशी चर्चा रंगली आहे.

कडोंमपामधील राजकीय गणितं!

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेली अनेक वर्षे शिवसेना भाजपची सत्ता आहे. मागच्या निवडणुकीध्ये सेना भाजप हे भले परस्पर विरोधी लढले असले तरी निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवला. मात्र, गेल्या वर्षभरापासून हे चित्र बदललेले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्रित लढणार का? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कल्याण डोंबिवलीत काँग्रेस राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. तरीही राष्ट्रवादीकडून शिवसेनेला चुचकरल्याचे दिसून आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रस्त्यांवरून शिवसेनेला टोला हाणला होता. याला शिवसेनेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. तर भाजपच्या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्स असले तरी मनातील डिस्टन्स वाढवू नका असे सांगत आपल्यात दुरावा अद्याप झालेला नाही आहे हे श्रीकांत शिंदे यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आता या ‘सौहार्दा’चे रुपांतर शिवसेना-भाजप युतीमध्ये होते का? याकडेच राजकीय जाणकारांचं लक्ष्य लागलेलं आहे.