घरताज्या घडामोडीरायगड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू श्रद्धा तळेकरची दैदिप्यमान कामगिरी

रायगड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू श्रद्धा तळेकरची दैदिप्यमान कामगिरी

Subscribe

आंतरराष्ट्रीय पदके कमावत उत्तुंग कामगिरी बजावत देशाचे नावलौकिक करून आई-वडिलांचे पांग फेडले. 

सुधागड तालुक्यातील पेडली या छोट्याशा गावातील श्रद्धा साईनाथ तळेकर हिची टोकियो येथे पुढच्या महिन्यात होणाऱ्या जागतिक जिम्नॅस्ट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मुलगा मुलगी एक समान असे मूल्य जोपासणारे वडील साईनाथ तळेकर आणि आई शितल तळेकर यांनी श्रद्धाचे अंगभूत क्रीडा कौशल्य ओळखून वयाच्या ८ व्या वर्षी काळजावर दगड ठेऊन पदरमोड करून लेकीला ठाण्याला मामाकडे शिकायला पाठवले. तिथून तब्बल 20 वर्षे लेकीपासून दुरावा आहे. मात्र लेकीने जिम्नॅस्टिक खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके कमावत उत्तुंग कामगिरी बजावत देशाचे नावलौकिक करून आई-वडिलांचे पांग फेडले.

 अन् श्रध्दाच्या खऱ्या कारकिर्दीला सुरुवात झाली…

शेतकरी असलेले साईनाथ तळेकर आणि गृहिणी शितल तळेकर यांची मुलगी श्रध्दा तळेकर. मोठा मुलगा दर्शन आणि मुलगी श्रद्धा. घरची परिस्थिती प्रतिकूल होती. कुटुंबाला या खेळाची कोणतीच पार्श्वभूमी नाही. त्यामुळे जिम्नॅस्टिकबद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. पण आपल्या मुलीला शिकवावे क्रीडा क्षेत्रात तिने काहीतरी करावे यासाठी काळजावर दगड ठेऊन साईनाथ आणि शितल तळेकर यांनी श्रद्धाला वयाच्या ८ व्या वर्षी ठाण्याला मामाकडे शिकायला पाठवले. तिथे तिने एक जिम्नॅस्टिक शिबिरात सहभाग घेतला. त्यानंतर अवघ्या काही वर्षात श्रद्धाने जिम्नॅस्टिक खेळातील चुणूक आणि कौशल्य दाखविले. मग तिला इयत्ता ८ वीमध्ये पुण्यातील बालेवाडीला दाखल करण्यात आले. तिथून श्रध्दाच्या खऱ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मामाकडे असताना किमान घरचे कोणीतरी पोरीसोबत होते. त्यामुळे चिंता नव्हती पण बालेवाडीला कोणीच नातेवाईक सोबत नव्हते. पण श्रद्धाने एवढ्या लहान वयात आईवडिलांना धीर आणि विश्वास दिला.

कुटूंबाची साथ मोलाची ठरली

काही दिवसांतच तिचे कोच तिचे आईवडील झाले. मग सराव अथक मेहनत आणि परिश्रम सुरू झाले. कधीतरी मे महिन्यात घरी सुट्टीला येत असे. पण त्यादरम्यान कुठे शिबिरे किंवा स्पर्धा असतील तर मग गावी जाता येत नसे. इतके वर्षे दूर राहत असल्याने तिला आईवडिलांची खूप आठवण येत होती. पण खेळावरील प्रेम, देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी आणि घरच्यांचे प्रेम यामुळे ध्येयापासून दूर हटले नाही. अपयशात देखील घरातील मंडळी आणि कोच यांनी प्रबलन केले धीर दिला, असे श्रद्धाने सांगितले. आपण खेळावर लक्ष केंद्रित करावे यासाठी आईवडिलांनी स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवल्या पदरमोड केली. पण पोरीला काही कमी पडू दिले नाही. लग्नाचे वय असतानादेखील आईवडील लग्नाचा तगादा लावत नाहीत. उलट तू तुझ्या खेळावर लक्ष दे तुला जे करायचे आहे तू कर. आमची तुला साथ आहे. असे आईवडील सांगतात. त्यामुळेच खेळाबरोबरच श्रद्धा उच्च शिक्षण घेत आहे. पुणे विद्यापीठातून ती एमपीएड करत आहेत. सध्या श्रद्धा दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये भारतीय संघाचा सराव शिबिरात आहे. आणि तिथेच एमपीएड ची परीक्षा देखील देत आहे.
लेकीने आमच्याबरोबर देशाचे नाव उंचावले आहे. तिचा खूप अभिमान वाटतो. तिने उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी. प्रत्येक पालकाने आपल्या मुलींना स्वातंत्र्य देऊन व अंगभूत गुण ओळखून त्यांना साथ व संधी उपलब्ध करून द्यावी.
-साईनाथ व शीतल तळेकर, श्रद्धाचे आईवडील

उतुंग कामगिरी

२०११ मध्ये श्रद्धाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रासाठी सुवर्ण मिळविले आहे. २०१८ मध्ये तिने अन इव्हन बार या प्रकारात राष्ट्रीय सुवर्ण जिंकले आहे. यासह इतरही अनेक परितोषिकांवर नाव कोरले आहे. तिला २०१५ – १६  ला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. फक्त एवढे ऍड कराटोकियो येथे पुढच्या महिन्यात होणाऱ्या जागतिक जिम्नॅस्ट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

कोच हे दुसरे आईवडील

श्रद्धाचे मामा कराटेपटू होते. तर मावशी कल्याणी गुरव यांनी जिम्नॅस्टिकचा सराव केला आहे.  तनुजा गाढवे, बाळासाहेब ढवळे महेंद्र बाभुळकर, संजोग ढोले, संजीवनी पूर्णपात्रे, योगेश शिर्के व प्रवीण ढगे या प्रशिक्षकांनी मौलिक मार्गदर्शन करून श्रद्धाचे आईवडील बनून तिला प्रशिक्षण दिले आहे, असे श्रद्धाने सांगितले.

कठोर परिश्रम

कोरोना काळात श्रद्धा गावी आली. त्यात मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळाने तिच्या घराचे पत्रे उडाले व नुकसान झाले. मात्र अशा परिस्थितीत देखील श्रद्धाचा सराव थांबू नये म्हणून सरावासाठी कुटुंबीयांनी वादळाने पडलेल्या झाडाच्या खोडाचा वापर केला. तसेच घरातील सागाचे लाकूड वापरून जिमनॅस्टिकची बीम आणि बार बनविले. तर मामा विश्वास गोफण यांनी कापड विणून मॅट तयार केले. अशा प्रकारे कुटुंबियांनी श्रद्धाच्या सरावासाठी क्लुप्त्या लढविल्या.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -