solid waste management : अलिबागमध्ये ग्रामीण प्रगतीच्या माध्यमातून राबविणार घनकचरा व्यवस्थापन

१२० तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार

घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज असल्याने पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी घनकचर्‍याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण प्रगती फाऊंडेशन ही सामाजिक संस्था पुढाकार घेत आहे. या माध्यमातून १२० सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्याचा मानस असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक देवांग नेराल्ला यांनी दिली. मुंबईतील ही संस्था गेले ७ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आजवर अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविले गेले आहेत. त्यामध्ये सध्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण आणि इतर काही उपक्रमांचा समावेश आहे. ही संस्था पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी देखील काम करते. त्याचाच एक अविभाज्य भाग म्हणजे घनकचरा व्यवस्थापन हा असल्याचे नेराल्ला यांनी सांगितले.या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सुशिक्षित तरुणांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. हे तरुण किमान पदवीधर असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी फाऊंडेशनच्यावतीने शिफारस केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश डफळे उपस्थित होते.


हे ही वाचा – घनकचरा व्यवस्थापन आराखडा, कचरामुक्त डंपिंग प्रभागातच कचऱ्याची विल्हेवाट