सोनियांचा अट्टाहास काँग्रेसच्या मुळावर

congress mlas demand to announce the implementation of resolution of handing over the responsibility to appoint cm to congress presidenr after oct 19

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्डप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने कारवाई सुरू केली आहे. नॅशनल हेराल्ड या प्रकरणाला मोठा इतिहास आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या. हळूहळू त्या काँग्रेस पक्षाच्या केंद्रस्थानी आल्या. पुढे २००४ ची लोकसभा निवडणूक आपण जिंकणार आणि आपणच पुन्हा येणार, असा आत्मविश्वास केंद्रातील भाजपच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेला होता. त्यात त्यावेळचे भाजपचे धडाडीचे नेते आणि निवडणूक प्रचार प्रमुख प्रमोद महाजन यांचा विशेषत्वाने पुढाकार होता. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढील नेते हे लालकृष्ण अडवाणी होते. त्यावेळी भाजपला तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाले होेते.

प्रमोद महाजन यांनी त्यासाठी दिल्लीत खास ‘इलेक्शन वॉर रूम’ तयार केली. तिथून सगळी यंत्रणा वापरली जात होती. त्यामुळे या रूमचे सगळ्यांनाच कुतूहल होते. त्यामुळे महाजन यांनी पाच महिने अगोदर लोकसभा निवडणूक घ्यायला केंद्रातील भाजप नेत्यांना भाग पाडले, पण कुणालाही फारसा आसभास नसताना सोनिया गांधी यांना लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. सोनियांचा नवा चेहरा प्रथमच लोकांसमोर प्रचारासाठी येत होता.

त्यावेळी प्रमोद महाजन सोनियांना पाहण्यासाठी जमणार्‍या गर्दीची खिल्ली उडवताना म्हणत असत की, जब कोई विदेशी आता हैं, तो उसे देखने को भीड एकट्टा हो जाती हैं, पण पुढे सोनिया गांधी यांना पाहण्यासाठी जमणार्‍या या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर झाले आणि भाजपची सत्ता गेली. प्रमोद महाजन यांची त्यावेळची रायजिंग इंडिया मोहीम, राईज झालीच नाही. त्यावेळी काँग्रेसला बुहमत मिळाले नसले तरी त्यांच्या जास्त जागा जिंकून आल्या, त्यावेळी काँग्रेसने मित्र पक्षांच्या मदतीने संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) स्थापन केली. काँग्रेसच्या विजयी खासदारांची संख्या जास्त असल्यामुळे काँग्रेसचा पंतप्रधान होणार हे निश्चित होते.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला हे यश मिळाले होेते. त्यामुळे काँग्रेसच्या विजयी खासदारांनी सोनिया गांधी यांनीच पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी गळ घालणारी भाषणे केली. त्यावेळचे खासदार अभिनेता गोविंदा यांनी तर अश्रूपात करून सोनियाजी आप नेता नही माता हो, असे भावनिक आवाहन करून सोनियांना पंतप्रधानपद स्वीकारावे म्हणून गळ घातली, पण सगळ्या विजयी खासदारांची भाषणे झाल्यावर सोनियांनी भाषण केले आणि आपल्या अंतरात्म्याचा आवाज आपल्याला ही जबाबदारी घेण्याला परवानगी देत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर नेमस्त, मितभाषी, बुद्धिजीवी असलेल्या मनमोहन सिंग यांच्या नावाची सोनिया गांधींनी पंतप्रधान म्हणून घोषणा केली.

पुढे दहा वर्षांच्या काळात युपीएच्या केंद्रातील मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येऊ लागली. त्यात घटक पक्षांतील मंत्र्यांची संख्या जास्त होती. सरकार पडेल म्हणून पंतप्रधान घटक पक्षांना दुखावू शकत नव्हते. त्यामुळे युपीए सरकारची बदनामी होऊ लागली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुका जवळ येत होत्या. यावेळी भाजपकडे देशपातळीवर प्रभाव टाकणारे नेतृत्व केंद्रात नव्हते, कारण सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचे वय झालेले होते. त्यामुळे युपीए तीन पुन्हा सत्तेत येणार आणि राहुल गांधी पंतप्रधान होणार असेच काँग्रेसजनांना वाटत होते, पण अचानक परिस्थिती बदलली. भाजपच्या प्रादेशिक पातळीवरून त्यावेळचे गुजरातचे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे येऊ लागले. राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या नेत्यांचा विरोध असूनही महत्वाकांक्षी असलेल्या मोदींनी मार्ग काढला आणि ते देशाचे पंतप्रधान झाले, इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे बहुमताचे सरकार आणले.

दुसर्‍या बाजूला काँग्रेसकडून मोदींच्या विरोधात राहुल गांधी यांना लढवण्यात येत होते. त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत नव्हता. काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते राहुल गांधींना लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रियांका लाओ काँग्रेस बचाओ, अशी मागणी करू लागले होते, पण अशांना सोनिया गांधी यांच्या आदेशावरून शांत बसवण्यात आले किंवा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. प्रियांका गांधी यांच्या विवाहाच्या पूर्वी त्या कशा इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात, त्यांची छाप कशी इंदिराजींसारखी पडू शकते, अशा प्रकारचे फोटो आणि चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होऊ लागली होती. त्यामुळे प्रियांका गांधी यापुढे आपल्या आजींची जागा घेतील, असे काँग्रेसजनांना वाटू लागले होेते, पण पुढे असे काय झाले कोण जाणे, प्रियांका गांधी यांचे रॉबर्ट वड्रा यांच्याशी लग्न झाले आणि प्रियांका इंदिराजींची जागा घेणार ही चर्चा बंद झाली. एक प्रकारे प्रियांका गांधी यांना बाजूला करण्यात आले. त्या राहुल गांधी यांच्यासोबत निवडणुकांच्या प्रचाराला जात होत्या, पण त्यांना मुख्य स्थान देण्यात आले नाही. खरे तर काँग्रेस पक्षाच्या हिताचा विचार करून सोनिया गांधी यांनी वेळीच प्रियांकांना पुढे आणले असते, तर आज काँग्रेसची देशभरात जी काही दुरवस्था झालेली आहे, निदान तितकी तरी झाली नसती.

शुक्रवारी सगळ्या गांधी कुंटुबीयांना काळे कपडे घालून रस्त्यावर उतरावे लागले होते, ती तरी वेळ आली नसती. त्या देशव्यापी आंदोलनाला देशातील वाढत्या महागाई आणि बेरोजगारीचे आवरण असले तरी त्यातील आतील वेदना ही नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून गांधी कुटुंबीयांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा आहे, हे काही लपून राहिलेले नाही. काँग्रेसचा प्रभाव कमी झाल्यामुळे सत्तेत असलेला भाजप अधिक आक्रमक झालेला आहे. काँग्रेसमुक्त भारतचा नारा देऊन मोदी सत्तेत आलेले आहेत. गांधी कुटुंबीयांच्या आधारावर काँग्रेस पुन्हा उसळी घेऊ शकतो, हे भाजपच्या नेत्यांना माहीत आहे. आज तसे पाहू गेल्यास काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झालेला आहे. राहुल गांधी पराभवामुळे इतके हतबल झालेले आहेत की, ते पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काही केल्या स्वीकारायला तयार नाहीत, पण तरीही सोनिया गांधी आपला राहुल गांधींसाठीचा अट्टाहास सोडायला तयार नाहीत. खरे तर त्यांनी प्रियांका गांधी यांच्या हाती पक्षाची सूत्रे देण्याची गरज आहे. शुक्रवारच्या आंदोलनात राहुल यांच्यापेक्षा प्रियांकांचा प्रभाव दिसून आला, पण हे सोनिया गांधी यांना का दिसत नाही हेच मोठे गूढ आहे.