ST Workers Strike : महाड आगारातून एसटी फेर्‍या सुरु ; संपातून माघार घेत कामगार आगारात रुजू

ST worker strike msrtc suspended 3,010 employees and send 270 Termination of service
ST worker strike: मागील २४ तासात ३,०१० कर्मचारी निलंबित, २७० कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई

महाराष्ट्र एस.टी.महामंडळाच्या कामगारांच्या संपाला अठरा दिवस झाल्यानंतर संपातील काही कामगार आज महाड आगारात हजर झाले. यामुळे तालुक्यातील काही ग्रामीण फेर्‍या सुरु झाल्या असून, महाड आगारातून आज दिवसभरात चार बसेस गेल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.महाराष्ट्र एस.टी. महामंडळाच्या कामगारांनी आठ नोव्हेंबर पासून विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. हा संप कामगार काही केल्या मागे घेत नसल्याने शासन स्तरावर काल झालेल्या बैठकीत काही मागण्या मान्य केल्याचे जाहीर केल्यानंतर आज काही कामगारांनी या संपातून माघार घेत कामावर हजर राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे रायगड जिल्ह्यातून पेण आणि महाड आगारातून ग्रामीण बसेस सुरु करण्यात आल्या. महाड एस.टी. आगारातील २८९ कामगार या संपात सामील झाले होते. यापैकी १४ प्रशासकीय कर्मचारी, ९ कार्यशाळा कामगार, ३ चालक आणि ३ वाहक असे एकूण २९ कामगार आज महाड एस.टी. आगारात हजर झाले. महाड एस.टी. आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी हजर कामगारांना हजर करून घेत एस.टी.सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला.

महाड आगारातून आज दुपारनंतर ३.२० वाजता फाळकेवाडी गावाला पहिली बस रवाना करण्यात आली. यानंतर पोलादपूर, गोरेगाव, माणगाव अशा बस सेवा सुरु करण्यात आली. यामुळे गेली अठरा दिवस ठप्प असलेली सेवा आज दुपारी अचानक सुरु झाल्याने प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

शासनाचा देकार ज्यांना मान्य आहे, असे कामगार कामावर येत आहेत. त्यांच्या मदतीने वाहतूक सुरू होईल. मात्र ज्यांना मान्य नाहीत ते हजर झालेले नाहीत
– शेखर सावंत, एस.टी. कामगार नेते महाड

शासनाने दिलेल्या आवाहनाचा आदर राखत जे कामगार आज हजर झाले त्यांच्या मार्फत आज ग्रामीण भागातील एस.टी.बसेस फेर्‍या सुरु केल्या आहेत. पूर्ण क्षमतेने कामगार हजर झाल्यास लवकरच ठप्प सेवा पुन्हा सुरु होईल
– शिवाजी जाधव, प्रभारी आगार प्रमुख महाड

 

                                                                                                  वार्ताहर – निलेश पवार


हे ही वाचा – MLC election: मुंबई विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, सुरेश कोपरकरांची माघार