ST Workers Strike: रायगड जिल्ह्यात ७९ एसटी कर्मचारी निलंबित

१०३ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस

ST worker strike msrtc suspended 3,010 employees and send 270 Termination of service
ST worker strike: मागील २४ तासात ३,०१० कर्मचारी निलंबित, २७० कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई

राज्यभरात सुरू असणारा एसटीचा संप दोन आठवडे झाले तरी संपायचे नाव घेत नसून, संप मिटायचा तर दूरच, याउलट अधिकच चिघळत चालला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत ७९ जणांना निलंबित करण्यात आले असून, १०३ जणांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊननंतर नुकत्याच शाळा-महाविद्यालये सुरू झाली असून, एसटीने प्रवास करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना खासगी वाहनांतून अधिकचे पैसे देऊन प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत.

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करून घेण्यासाठी, तसेच इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी राज्यातील अनेक कामगार संघटना एकत्र येऊन या संपामध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यातील संपूर्ण एसटी सेवा ठप्प झाली असून, जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीला एसटीचा संप एक-दोन दिवसानंतर मिटेल अशी शक्यता वाटत होती. मात्र संपकरी आणि राज्य शासन हे दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने हा विषय न्यायालयात गेल्याने आता हा संप चिघळणार याची खात्री झाली होती. मात्र संपकरी काही केल्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने हे संप मोडीत काढण्यासाठी राज्य शासनाने संपकरी कर्मचार्‍यांचे निलंबन करण्याची सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने केलेल्या निलंबनाचा जिल्ह्याचा आकडा ७९ वर जाऊन ठेपला आहे.

मात्र संपकरी कर्मचारी राज्य शासनाच्या या कारवाईला न घाबरता आणि न डगमगता आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने शासनाने दुसरा पर्याय म्हणजे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी परिवहन खात्याने खासगी वाहनांना एसटीच्या दरात प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाने तेथेही न थांबता कंत्राटी कामगारांकडे आपला मोर्चा वळवला आणि हजारो कंत्राटी कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील ८ आगारांमधील १०३ कंत्राटी कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. मात्र आम्हाला या नोटीस आल्या तरी आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम असून, राज्यातील आत्महत्या केलेल्या कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत आणि त्यामुळे आम्ही कामावर जात नाही, असे या कंत्राटी कर्मचार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

एसटी कर्मचारी आणि राज्य शासन या दोघांमधील आडमुठेपणामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी प्रवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यात विना पासधारक आणि पासधारक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एसटीला होणार्‍या लाखो रुपयांच्या उत्पन्नात घट तर झालीच, शिवाय विद्यार्थ्यांच्या विश्वासास प्राप्त ठरलेल्या एसटीतून जे विद्यार्थी प्रवास करीत होते त्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून खाजगी वाहनांमधून अधिकचे पैसे खर्च करून प्रवास करणे भाग पडत आहे. त्यामुळे यातून एसटीला आणि विद्यार्थी, प्रवाशांना सुद्धा आर्थिक फटका बसत असल्याने या संपावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

लॉकडाऊननंतर शाळा, महाविद्यालये सुरू झाली असल्याने दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील एसटीचा प्रवास करण्यासाठी मासिक, त्रैमासिक पास काढले होते. मात्र अचानक एसटीचा संप सुरू झाल्याने एसटीच्या प्रवासापासून वंचित राहिलो आहोत. मात्र आता शाळा, महाविद्यालयात जाताना खासगी वाहनांमधून प्रवास करताना आम्हाला जादा पैसे द्यावे लागत आहेत, त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.

-राजेश पाटील, विद्यार्थी, कळवे-पेण

डेपोनिहाय निलंबित कर्मचारी

महाड -५

अलिबाग-१४

पेण-३

श्रीवर्धन-५

कर्जत -६

रोहे -५

मुरुड -३

माणगाव-९

विभागीय कार्यालय-२१

विभागीय कार्यशाळा-८

एकूण -७९


हे ही वाचा -ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, १० तारखेपर्यंत होणार पगार, अनिल परबांची घोषणा