रायगड जिल्ह्यातील गडवेडा माणूस, १०० हून अधिक किल्ल्यांना भेटी

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील चौक आसरोटी येथील तरुण रोहिदास राघो ठोंबरे हा स्वतः तर ‘गडवेडा’ आहेच, पण इतरांनाही तो गडकिल्ले फिरून माहिती देतो. आजवर त्याने सर्वांना ट्रेकिंग आणि गड फिरण्याचे वेड लावले आहे. रोहिदास ठोंबरे याने आतापर्यंत १०० हून अधिक गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आहेत.

गडकिल्ले ही आपली अस्मिता आहे हे ओळखून रोहिदास ठोंबरे यांनी गुरुवार ११ नोव्हेंबर २०२१ ते रविवार १४ नोव्हेंबर २०२१अशा चार दिवसांची गडकोट अभ्यास मोहीम नुकतीच पार पाडली. ११ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील अत्यंत थरारक सह्याद्रीची लांबच लांब रांग, कराल कातळ सुळके गगनाला भिडलेले सर त्याने सर केले. सुमारे २१३७ फूट उंच गोरखगडही त्याने लीलया सर केला. तर दुसर्‍या दिवशी पुणे जिल्ह्यातील सुमारे ३००० फूट उंच असलेला कोरीगड पार करत १३ नोव्हेंबर रोजी पेण तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात वसलेला सुमारे ८५० फूट कातळटप्पा असलेला सांकशी किल्ला अभ्यासला. शेवटी १४ नोव्हेंबर रोजी २५०० फूट उंच असलेल्या किल्ले कर्नाळा पार केला. कर्नाळा किल्ले या ठिकाणी आपल्या सलग चार दिवस गडकोट अभ्यास मोहिमेची सांगता केली. ही अभ्यास मोहीम त्यांनी आपल्या वैकुंठवासी आईवडील यांना अर्पण केली.

या चार दिवसांत समुद्र सपाटीपासून सुमारे ८४८७ फूट दुर्ग चढाई केली. या मोहिमेत गोरखगडला आकाश गोडीवले, प्रसाद जाधव, रोशन ठोंबरे व जितेंद्र कदम यांनी सोबत दिली. तर कोरीगडला राजेश मांडे तर सांकशीला शंतनू पंदेकर आणि कर्नाळा किल्ल्यावर प्रशांत शेलार हे दुर्गसेवक सोबत होते. रोहिदास ठोंबरे हे व्यवसायाने शिक्षक आहेत. गेली १९ वर्षे खालापूर तालुक्यातील रोहिदास कोचिंग क्लासेसचे संचालक म्हणून ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. तसेच ते शिवकार्य ट्रेकर्स या दुर्गसंवर्धन संस्थेचे संस्थापक असून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या दुर्गसंवर्धन संस्थेचे सदस्य आहेत. याशिवाय ते पत्रकार व लेखक आहेत.

आपल्या अत्यंत व्यस्त वेळेतून सुद्धा ते गडकोट अभ्यास मोहीम करीत आले आहेत. आपल्या सर्वोत्तम लेखणीच्या माध्यमातून व आपल्या रोहिदास ठोंबरे या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम,व्हाट्स अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ले, त्यांचा प्राचीन इतिहास, तेथील जनजीवन, तेथील संस्कृती असे महत्वाचे विषय ते आजपर्यंत मांडत आले आहेत.