घरताज्या घडामोडीजीवनाचा अंतिम प्रवास सुखकर करणारी महिला

जीवनाचा अंतिम प्रवास सुखकर करणारी महिला

Subscribe

मी सुनीता पाटील. गेल्या १५ वर्षांपासून मी मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहे. ‘जिवंत व्यक्ती फसवू शकतात; पण मृत व्यक्ती आपल्याला कधीच फसवत नाहीत’ म्हणूनच सामाजिक आपुलकीच्या पोटी मी हे कार्य करतेय. शेवटच्या प्रवासात त्यांना मदत करणे हे पवित्र कार्य असून मी त्यासाठी स्वत:ला भाग्यवान समजते. नाशिक मधील पंचवटी स्मशानभूमीत रोज पाच मृतदेह आणले जातात; पण कोरोना महामारीमुळे आता दिवसाला सत्तावीस ते तीस मृतदेह आणले जातात. खूप भयंकर स्थिती आहे. असं विदारक दृश्य कधीही पाहिलेले नाही.

जिवंत माणसांची सगळेच काळजी घेतात. पण मृतांची काळजी घेणं हे मी वडिलांकडून शिकले आहे. माझे वडील अंत्यसंस्कारासाठी लागणारे सामान विकत. त्यावेळी मी दहा वर्षांची होते. यामुळे या सगळ्या गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या आहेत. मृताचा चेहरा स्वच्छ करून, मृताचे तेल, तूप आणि चंदन लावून, नवीन वस्त्र परिधान करून विधी केल्या जातात. पण त्या पुरुषच करत असल्याने सुरुवातीला लोकांनी मला विरोध केला. स्मशानभूमीतून हाकलून लावलं. पण मी हार नाही मानली.

- Advertisement -

‘पाच भाऊ आणि बहीण यात मी धाकटी आहे. मला दोन मुलं असून ते दुकान चालविण्यात मला मदत करतात. मला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पण मला पुरस्कारांमध्ये नव्हे तर मृतांची काळजी घेण्यात समाधान मिळते. मग तो दिवस असेल किंवा रात्र. पण एका गोष्टीने मात्र माझे कायम मन दुखावते. ते हे की मुले गमावलेल्या पालकांचे दुःख पाहून खरोखर वेदना होतात. ‘जेव्हा लहान मुले आत्महत्या करतात किंवा अपघातात मरण पावतात. त्यांचे मृतदेह जेव्हा अंत्यसंस्कारासाठी आणले जातात, त्यावेळी मला अपार वेदना होतात. तरी घरातील मोठ्यांनीच नाही तर लहान व्यक्तींनीही नाती सांभाळायला हवीत. आयुष्य क्षणभंगुर आहे. त्यामुळे माणसं जपायला हवीत. शेवटी जाताना आपण रिकाम्या हातानेच जातो.

-शब्दांकन-चैत्राली अढांगळे (नाशिक).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -