सुरेश लाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले माजी आमदार सुरेश लाड यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने बोलवलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करत खळबळ उडवून दिली आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व असलेले खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे लाड यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे.  प्रकृतीमुळे पदाला न्याय न देऊ शकत असल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले असले तरी एका बाजूला असलेली महाविकास आघाडी तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात कायम उडणारे खटके यामुळे होणारी घुसमट यामुळे हा निर्णय लाड यांनी घेतला असल्याचे समजते.

निवडणुका आल्या, निवडणुकांचे बिगुल वाजले की रायगड जिल्ह्यात राजकीय भूकंप व्हायला सुरवात  होते. त्याचप्रमाणे मंगळवारी त्याची प्रचिती आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुरेश यांनी यांनी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेत जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. ऑक्टोबर महिन्यात आपल्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर  डॉक्टरांनी  डिसेंबर महिन्यापर्यंत आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपल्यावर  जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी पडल्यानंतर आणि त्यानंतर आलेल्या कोरोना संसर्गामुळे पक्षाचे काम करता आले नाही. या एकूणच परिस्थितीत जिल्हाध्यक्ष म्हणून वेळ देता येणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पदमुक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.  राज्यातील नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यात लाड यांचा निर्णय सर्वांसाठी मोठा धक्का आहे.


या आजारपणामुळे एवढा मोठा निर्णय का असा प्रश्न पत्रकारांनी लावून धरला  तेव्हा सुरवातीला प्रकृती हे कारण लावून धरलेल्या लाड यांनी यानंतर एकंदर खुलाशाचे संकेत दिले. राज्यामध्ये तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रस आणि शिवसेना यांच्या विचारसरणीत फरक आहे. असे असताना पूर्वी एकमेकांविरुद्ध लढलेले पक्ष एकत्र आले. त्यांच्या माध्यमातून सरकारही गेले दोन वर्षे चालत आहे. मात्र रायगड जिल्ह्यात तसेच कर्जत खालापूर मतदार संघात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही मोठे पक्ष आहेत. आणि या दोन्ही पक्षात विस्तव देखील जात नाही अशी स्थिती आहे. आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फॉर्मुला चालणार हे पक्ष नेतृत्वाने जाहीर केले आहे. तर कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातले विकोपाचे वाद जिल्ह्यांनी पहिले आहेत. त्यामुळे घुसमट होऊ नये याकरिता लाड यांनी पदाची चौकट ओलांडली असल्याचे एकंदर चित्र आहे.

पदाचा राजीनामा दिल्याने आता मी बंधनातून मुक्त आहे. तेव्हा जे चुकीचे असेल त्याविरोधात  रस्त्यावर उतरणारच, चुकीचं आगोदर देखील खपवून घेतले नाही घेणार नाही माझ्या गोरगरीब जनतेसाठी सदैव मी खंबीर आहे असे देखील सुरेश लाड यांनी ठणकावून सांगितले .


हे ही वाचा : Farmers Protest: कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला आज मिळू शकते मंजूरी; सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक