महाराष्ट्रात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक लक्ष घरे बांधणार – दिलीप वळसे पाटील

महाड पोलिसांच्या निवास इमारतीचे उद्घाटन

Target of one lakh houses in Maharashtra - Dilip Walse Patil
महाराष्ट्रात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक लक्ष घरे बांधणार - दिलीप वळसे पाटील

महाडसह पोलादपूर आणि एमआयडीसी पोलिसांकरिता शहरात उभ्या राहिलेल्या भव्य इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन बुधवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी महाड प्रमाणेच राज्यातील इतर भागात पोलीस कर्मचार्‍यांना घरे बांधून देण्याचा आमचा मानस असल्याचे सांगून भविष्यात एक लक्ष घरांचे लक्ष्य असल्याचे देखील स्पष्ट केले. या सोहळ्यास जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे प्रत्यक्ष, तर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, पोलीस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव ऑनलाईन उपस्थित होते.

वळसे पाटील यांनी कोरोना आणि आपत्ती काळात स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष न देता नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलेल्या पोलिसांचे कौतुक करून गेले अनेक वर्षे भाड्याच्या खोलीत राहणार्‍या पोलिसांना स्वतःच्या घरात जाताना पाहताना आंनद होत असल्याचे सांगितले. राज्यातील ८० टक्के कर्मचार्‍यांना घरे मिळावीत याकरिता ७०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही ते म्हणाले. पालकमंत्री तटकरे यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करताना रायगड पोलिसांचे पथक सर्वोत्कृष्ट पोलीस पथक असल्याने त्यांच्या विकासकामांना झुकते माप द्यावे, अशी विनंती वळसे पाटील यांच्याकडे केली.
देसाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कायम पोलीस कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी सकारात्मक भूमिका घेत असल्याचे सांगितले. तर राज्यात अशा प्रकारे पोलीस वसाहती मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा खासदार तटकरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, या इमारतीत १०८ सदनिका असून, यातील १२ अधिकार्‍यांसाठी, तर ९६ सदनिका कर्मचार्‍यांसाठी आहेत. यामध्ये व्यायामशाळा, कम्युनिटी हॉल, गार्डन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


हे ही वाचा – पाहणी दौऱ्यात अजित पवार धरणाच्या पाण्यात मधोमध अडकले, काय आहे प्रकरण जाणून घ्या