Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नगरोटामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून कमांड!

नगरोटामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून कमांड!

Related Story

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी भल्या पहाटे जम्मू-काश्मीरच्या नगरोटा टोल नाक्यावर मारल्या गेलेल्या ४ दहशतवाद्यांना थेट पाकिस्तानमधून कमांड येत असल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या डिजिटल मोबाईल रेडिओवरच्या संदेशांवरून ही माहिती मिळाली असून पाकिस्तानमधून येणारे हे निर्देश जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मसूद अजहर याचा भाऊ रौफ अजहर देत असल्याचा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर या डिजिटल मोबाईल रेडिओवर आलेल्या संदेशांची अधिक माहिती घेतली जात आहे.

गुरुवारी पहाटे जम्मू-काश्मीरच्या नगरोटा टोल नाक्यावर एका साखरेच्या ट्रकमध्ये दहशतवादी असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी या ट्रकची झडती घेण्यासाठी तो थांबवला असता ट्रकमधून ग्रेनेड फेकण्यात आलं. या हल्ल्यानंतर नजीकच्या चेकपोस्टवरून सीआरपीएफचे जवान देखील टोलनाक्यावर आले आणि त्यांनी ट्रकवर फायरिंग सुरू केली. दोन्ही बाजूंकडून तब्बल अडीच तास फायरिंग झाल्यानंतर शेवटी ट्रकला आग लागली. काही वेळाने आग विझवून जेव्हा ट्रकची तपासणी केली गेली, तेव्हा त्यात चार दहशतवाद्यांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले. त्यासोबतच, ११ एके रायफल्स, ३० हँड ग्रेनेड, ६ रॉकेट लाँचर ग्रेनेड, ३ पिस्तुल, २ आयईडी रिमोट, २ कटर, औषधं, सुका मेवा आणि पूर्णपणे तयार नसलेली स्फोटकं सापडली.

- Advertisement -

दहशतवाद्यांकडे सापडलेल्या डिजिटल मोबाईल रेडिओवर ‘पहुँच गये? कोई परेशानी तो नहीं हुई?’ अशी विचारणा करणारे मेसेज मिळाले. हे मेसेजेस पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या हँडलर्सकडून आले असून ते मसूदचा भाऊ रौफनंच पाठवले असावेत, असा संशय तपास यंत्रणांना आहे. मुंबई हल्ल्याप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्ये देखील असाच भयानक हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना असावी, असा कयास बांधला जात आहे.

- Advertisement -