आता एकहाती भगव्यासाठी सर्वांनी कामाला लागा

जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ठाकरेंचे आदेश

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, सरकारमध्ये शिस्तीने काम करणार्‍या राष्ट्रवादीकडे पाहा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुखांसोबत काल रात्री उशिरा पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. रात्री १० वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली.

यंदा कोविडच्या काळात राज्य सरकारकडे निधीची कमतरता असली तरी पुढच्या वर्षी जिल्ह्यांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना यावेळी दिले.

कोविडच्या काळात सरकार आपले काम करत आहे; पण पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना केल्या. टीकाकारांना टीका करू द्या, तुम्ही तुमचे काम करत राहा, असा सल्लाही ठाकरेंनी या संवादात दिल्याचे सांगण्यात आले.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी घणाघाती भाषणात विरोधकांवर प्रामुख्याने भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. याशिवाय शिवसेनेचे कट्टर शत्रू असलेले भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा चढवला होता. जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव यांनी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजाकडे लक्ष वेधले. असे शिस्तबद्ध काम व्हायला हवे असे ते म्हणाले. सरकारचे काम तळागाळात पोहोचले पाहिजे असे ते म्हणाले. काही जिल्हाध्यक्षांची निधीअभावी कामे होत नसल्याच्या तक्रारी केल्या तेव्हा ही अडचण लवकरच दूर होईल, असा विश्वास त्यांनी दिला.