भारत सरकारने मुस्लिमांची माफी मागावी, ठाणे शहर पोलिसांचे संकेतस्थळ हॅक

वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वेबसाईट हॅक केल्यानंतर लगेच सायबर तज्ञांशी संपर्क साधला यानंतर हॅकर्सचा आयपी एड्रेस ट्रेस करण्यात आला आहे. इंडोनेशियाचा आयपी एड्रेस असल्याचे समोर आले आहे.

Thane city police website hacked and shows Government of India should apologize to Muslims
भारत सरकारने मुस्लिमांची माफी मागावी, ठाणे शहर पोलिसांचे संकेतस्थळ हॅक

भारत सरकारने जगभरातील मुस्लिमांची माफी मागावी अशी मागणी करत हॅकर्सने ठाणे शहर पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केले आहे. नुपूर शर्मा प्रकरणी मुस्लिमांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यासंदर्भातच हॅकर्सने पोलिसांचे संकेतस्थळ हॅक केले आहे. ठाणे पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ हॅक करण्यात आले असल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. संकेतस्थळ सुरु केल्यावर “हैक्ड बाय वन हैट सायबर टीम” असा संदेश दाखवत आहे. ज्या हॅकरने वेबसाईट हॅक केली त्याने भारत सरकारने जगातील मुस्लिमांची माफी मागावी असे म्हटलं आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून मंदिर आणि मशिदींवरुन वातवारण तापलं आहे. यामध्ये नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिमांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तसेच प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणी प्रकरणामुळे देशात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्यासह मुस्लिम समाजातील दिग्गजांनी देशात मुस्लिम असुरक्षित असल्याचे म्हटलं आहे. यामध्ये आता ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले आहे.

जगातील मुस्लिमांची माफी मागा

ठाणे शहर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर लिहिलेल्या संदेशात ही बाब लक्षात आली आहे. हॅक झालेल्या व्यक्तीने लिहिले की, “भारत सरकार, तुम्ही इस्लामच्या संदर्भात वारंवार अडथळे आणता, तुम्हाला सहिष्णुता दिसत नाही, जगातील मुस्लिमांनी लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.” वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वेबसाईट हॅक केल्यानंतर लगेच सायबर तज्ञांशी संपर्क साधला यानंतर हॅकर्सचा आयपी एड्रेस ट्रेस करण्यात आला आहे. इंडोनेशियाचा आयपी एड्रेस असल्याचे समोर आले आहे.

भारतीय दूतावासाचे संकेतस्थळ हॅक

इस्त्रायलमध्ये भारतीय दूतावासाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते. भारतामध्ये एकूण ७० सायबर हल्ले करण्यात आले. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर भारतामध्ये बँकींग क्षेत्रामध्येसुद्धा अनेक बँकांचे सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला अलसल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा : मोदी सरकारचं मोठं गिफ्ट; पुढील दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या देणार