ठाणे डान्स बार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांचे निलंबन

अन्य संबंधित अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

Thane dance bar case Four including two officers of excise department suspended
ठाणे डान्स बार प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांचे निलंबन

राज्यात कोरोनाबाबत निर्बंध लागू असताना ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आम्रपाली आणि अँटीक पॅलेस, तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नटराज हे तीन डान्स बार अवैधरित्या सुरु ठेवण्यात आले होते. तसेच या तिन्ही डान्स बारमध्ये कोरोनाबाबत नियमांना धुडकावून बारबाला नृत्य करीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी वर्तकनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित केले होते. तसेच दोन सहायक पोलीस आयुक्तांची बदली केली होती. त्यापाठोपाठ आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांचे निलंबन करण्यात आले आहे.

ठाणे डान्स बार प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दखल घेतली आहे. संबंधित अनुज्ञप्तींचे कार्यक्षेत्रीय अधिकारी प्रदीपकुमार हरिश्चंद्र सरजिने आणि बजरंग रामचंद्र पाटील या दुय्यम निरीक्षकांसह ज्योतिबा पाटील आणि सुरेंद्र म्हस्के या जवानांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

अन्य संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

या चौघांवर सदर कार्यक्षेत्रात गस्त घालण्याची, दक्ष राहून सदर अनुज्ञप्तींवर कारवाई करण्याची जबाबदारी होती. परंतु, ठरवून दिलेल्या वेळेनंतरही बार सुरु राहिले. तसेच कोविड नियमावलीच्या अंमलबजावणीचे पालन न झाल्याने आणि शासकीय कामकाजात अत्यंत बेजबाबदारपणा दर्शविल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.