घरठाणेThane : ठाण्यात हुक्का पार्लर आणि डान्सबार रात्रभर सुरुच ; संजय केळकर...

Thane : ठाण्यात हुक्का पार्लर आणि डान्सबार रात्रभर सुरुच ; संजय केळकर यांचे गृहमंत्र्यांना पत्र

Subscribe

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठाणे शहराला रात्रभर बेकायदेशिरपणे सुरू असलेल्या डान्सबार, हुक्का पार्लरसारख्या अवैध धंद्यांनी काळिमा फासला आहे. आमदार संजय केळकर यांनी ही बाब उघडकीस आणूनही रात्रभर हे धंदे सुरू नसून नियमानुसार चालतात, असे लेखी उत्तर ठाणे पोलिसांकडून मिळाल्याने जागरूक ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठाणे शहराला रात्रभर बेकायदेशिरपणे सुरू असलेल्या डान्सबार, हुक्का पार्लरसारख्या अवैध धंद्यांनी काळिमा फासला आहे. आमदार संजय केळकर यांनी ही बाब उघडकीस आणूनही रात्रभर हे धंदे सुरू नसून नियमानुसार चालतात, असे लेखी उत्तर ठाणे पोलिसांकडून मिळाल्याने जागरूक ठाणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाणे महापालिका हद्दीत डान्स बार, हुक्का पार्लर, पब, परमिट रूम आदी अवैध धंदे बेकायदेशीरपणे रात्रभर सुरू असल्याच्या तक्रारी जागरूक ठाणेकरांकडून सातत्याने येत होत्या. त्याबाबतच्या व्हिडीओ क्लीपही प्रसारित झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे शहराचे आमदार केळकर यांनी पुढाकार घेत बेकायदेशीरपणे सुरू असलेले हे अवैध धंदे बंद करण्याची किंबहुना अशा व्यवसायांचे परवानेच रद्द करण्याची मागणी  केळकर यांनी ठाणे पोलिसांकडे केली होती.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाकडेही पाठपुरावा केला होता. दरम्यान काही धंद्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी केळकर यांना दिली. विशेष म्हणजे कोरोना काळात शासनाची नियमावली लागू असताना हे धंदे नियमबाह्य सुरू होते. त्याची साधी दखलही उत्पादन शुल्क विभागाने घेतली नसून एकही गुन्हा यासंदर्भात दाखल झाला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर असे कोणतेही धंदे नियमबाह्य चालत नसल्याचे आढळून आले आहे, असे हास्यास्पद लेखी उत्तर ठाणे पोलिसांकडून आमदार केळकर यांना मिळाले आहे. अशा धंद्यांबाबत आवाज उठवणाऱ्या जागरूक नागरिकांवर दबाव टाकला जातो किंवा त्याला मारहाण करून त्याचा आवाज दाबला जातो अशा तक्रारीबाबतही ठाणे पोलिसांना काही आढळून आलेले नसल्याचे उत्तरात म्हटले आहे. एकूणच रात्रभर नियम मोडून सुरू असलेले हे धंदे ठाणेकर उघड्या डोळ्यांनी पाहत असताना ठाणे पोलिसांना ते कसे दिसत नाहीत याकडे जागरूक नागरिक आता संशयाने पाहू लागले आहेत.

- Advertisement -

ठाणे पोलिसांच्या या उत्तरानंतर  केळकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र देऊन नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे पोलिसांचे हे उत्तर बेजबाबदार आणि दिशाभूल करणारे आहे. हे धंदे रात्रभर बेकायदेशीरपणे सुरू असल्याची चित्रफीत माध्यमांद्वारे सर्वदूर पोहोचली असताना विशेष शाखेकडून असे काही घडतच नसल्याचे लेखी उत्तर देत आहे. शहरात चाललेल्या या अवैध धंद्यांबाबत प्रत्येक पोलीस स्थानकाला इत्यंभूत माहिती असते, यावर आपला विश्वास आहे. तरीही असे उत्तर मिळत असेल तर त्याला इलाज नाही, अशी खंतही आ. केळकर यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. शहरात अनधिकृत, अवैध, नियमबाह्य धंदे कदापि होता कामा नयेत. शांतता सुव्यवस्था असावी ही सर्वसामान्य नागरिकांची माफक अपेक्षा आहे. पोलीस खात्याने माहिती न घेता शहरात सारे काही आलबेल असल्याचे उत्तर लोकप्रतिनिधीला लेखी स्वरूपात देणे हे कितपत योग्य आहे. उलट काय कारवाया झाल्या, किती ठिकाणी सील ठोकले, कोणती उपाययोजना केली याची माहिती मिळणे मला अपेक्षित होते. या प्रकरणी सर्व बाबी तपासून कारवाई करावी, असे आमदार संजय केळकर यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.


हे ही वाचा – Mumbai : ९ कोटी रुपये खर्च करुनही शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या मोकाटच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -