‘इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या २० शहरात समावेश

thane selected for Eat Smart Cities Challenge
'इट स्मार्ट सिटीज’ चॅलेंजमध्ये ठाण्याचा देशातील पहिल्या २० शहरात समावेश

स्मार्ट सिटीज मिशन आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या इट स्मार्ट सिटीज चॅलेंजमध्ये ठाणे शहराचा देशातील पहिल्या २० शहरांच्या यादीत समावेश झाला आहे. तसेच महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव महापालिका ठरली आहे.

१५ एप्रिल २०२१ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत देशातील सर्व १०० स्मार्ट शहरांसह एकूण १०९ शहरांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी निवडलेल्या शहरांना मिलान अर्बन फूड पॉलिसी पॅक्ट, फूड फाऊंडेशन यासह इतर आंतरराष्ट्रीय तज्ञांसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. १४ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत या शहरांना आपले सादरीकरण करावे लागणार आहे. यासोबतच शहराला खाद्यपदार्थाबाबत जागरूक आणि संवेदनशील बनवण्यासाठी पुढील तीन वर्षांची रणनीती आखण्यात येणार आहे. स्कोअरकार्ड, व्हिजन फॉर्म आणि सादरीकरणात मिळालेल्या गुणांच्या आधारे टॉप ११ शहरांची निवड करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तपणे काम केले. अन्न परवाना, खाद्यपदार्थ नोंदणी, इट राइट कॅम्पस, इट स्मार्ट स्कूल, स्वच्छता रेटिंग, अन्न भेसळीची ऑन स्पॉट तपासणी या आव्हानांसाठी विहित केलेल्या कामांवर व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.

प्राथमिक निवड चाचणीत ठाणे, आग्रा, अजमेर, भोपाळ, बेंगलोर, चंदीगड, इंदोर, जबलपूर, पणजी, पटना, राजकोट, सागर, शिमला, सुरत, तुमाकुरू, तिरुनेलवेली, बडोदा, उज्जैन, जम्मू आणि रौरकेला आदी शहरांची निवड करण्यात आली आहे.


हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्याबाहेर अभाविपचे आंदोलन