घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणाची लढाई जिंकणारच

मराठा आरक्षणाची लढाई जिंकणारच

Subscribe

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विधानसभेत आशावाद

महाराष्ट्रात आणीबाणीची चर्चा करणार्‍यांनी ईडीचा वापर नको त्या पध्दतीने केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर विधानसभेत जोरदार हल्ला चढवला. राज्याच्या बदनामीचा विडा उचलणार्‍या तुमच्या समर्थकांविरोधी हक्कभंग टाकला म्हणून आमदारांविरोधात ईडीची चौकशी लावणार असाल तर महाराष्ट्र ते कदापि खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बजावलं. शेतकर्‍यांसाठी कळवळा व्यक्त करणार्‍यांनी दिल्लीत आंदोलनातील शेतकर्‍यांना अतिरेकी, खलिस्तानी, पाकिस्तानी संबोधणार्‍यांचे काय करायचे, अशी विचारणा करत मुख्यमंत्र्यांनी भाजपला जोरदार टोले लगावले. मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या पाठपुराव्याची माहिती दिली. मागल्या सरकारने दिलेल्या लिगल पॅनेलमध्ये जराही बदल केला नाही, असे सांगत आरक्षणाची ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी टाळ्यांच्या गजरात दिला. मात्र या आरक्षणात मिठाचा खडा टाकणारे महाराष्ट्रात समाजासमाजात विघातक शक्ती वितुष्ट निर्माण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मात्र, कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे आरक्षण काढले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आघाडीच्या एक वर्षाच्या काळातील कामकाजाची माहिती पुस्तिकेच्या केलेल्या उल्लेखावर ज्यांनी आजवर इतरांच्या कुंडल्या वाचल्या ते आता पुस्तकं वाचू लागले आहेत, अशी टीका केली. कोरोनाच्या संकटाचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना चिमटे काढले. ते म्हणाले, महाराष्ट्राने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक आरोग्य संघटना करते, धारावीच्या पॅटर्नचं कौतुक जगाने केलं असताना विरोधी पक्ष केलेल्या कामाचं कौतुक कराचं औदार्य दाखवत नाहीत, याचा अर्थ काय, अशी विचारणा त्यांनी केली. देशात व्हॅक्सिन आणि लस येण्याची घोषणा झाली असली तरी ती कधी येईल, हे सांगता येत नाही, अशावेळी संकटाला ओढवून घेणे योग्य नाही. यामुळेच अधिवेशन दोन दिवसांचे बोलवण्यात आल्याचा खुलासा करताना केंद्रातल्या सरकारने तर अधिवेशनच टाळल्याचे सांगत विरोधकांची बोलती बंद केली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबवणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. घराघरात जाऊन आरोग्याची तपासणी या संकल्पनेतून सुरू झाली. राज्याच्या आरोग्याचा नकाशाच यातून तयार झाला.

- Advertisement -

आपण इतर देशांचं कौतुक करतो; पण आपल्या राज्याने 17 दिवसात हॉस्पिटल उभे केले याचे कौतुक नाही? नेमके काही कळत नसताना आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला, याचे कौतुक करावेसे नाही वाटले? अशी विचारणा त्यांनी केली. मेट्रोसाठी आरेतील जागा बदलण्यात आल्याप्रकरणावर बोलताना त्यांनी उपचार सुरू असताना त्यावर काहीही चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. मालकी कोणाची यापेक्षा प्रकल्प कोणासाठी आहे, याची विचारणाही न्यायालयाने केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. समृध्दी महामार्गावरही आक्षेप नोंदवले गेले. त्यातून मार्ग निघालाच ना? बुलेट ट्रेनची मागणी महाराष्ट्राने केली होती काय? मोक्याची जागा त्या प्रकल्पाला दिली होतीच ना? आपल्या राज्यात केवळ चार स्टेशन, या राज्यातून अहमदाबादला कोण जाणार आहेत? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केला. राज्याच्या हिताआड राजकारण आणू नका. जंगलात शहर अशी कुठेच व्यवस्था नसेल. आरेतील प्रकल्प कांजूरला गेल्याचा फायदा अधिक आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यापुढे पर्यावरण राखूनच प्रकल्प होतील. तुम्ही राज्याचे द्रोही नाहीत. विरोधाला विरोध कशाला?

शेतकर्‍यांच्या विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा उल्लेख केला. या आंदोलनातील शेतकर्‍यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, अतिरेकी ठरवताना कसे काय वाटले नाही? जे हे करतात तेच राज्यात आणीबाणीची चर्चा करत आहेत. राज्याची बदनामी करणार्‍या तुमच्या समर्थकांविरोधात हक्कभंग टाकला म्हणून आमदारावर ईडी लावणार, त्यांच्या मुलांवर, नातवांवर ईडी लावणं हा काय प्रकार आहे? याला अघोषित आणीबाणी संबोधले तर? राज्यातील गडकिल्ल्यांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, गडकिल्ले ही महाराष्ट्राची आपली ओळख आहे. गडकिल्ल्यांवरील आणि इतरही प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल, त्यासाठी विशेष निधी निर्माण केला जाईल. टप्प्याटप्प्याने हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी मुख्यमंत्र्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -