सत्तेचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला, तर तोटा काँग्रेसला – प्रवीण दरेकर

pravin darekar 1
प्रवीण दरेकर

राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारला २८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत असताना विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची धार तीव्र केली आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारला सत्तेत एक वर्ष पूर्ण होत असतानाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमधले मतभेद देखील वेळोवेळी समोर आले आहेत. याच मुद्याचं आता विरोधकांकडून देखील भांडवल केलं जात आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माय महानगरच्या खुल्लम खुल्ला कार्यक्रमात बोलताना राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका केली. तसेच, या सरकारचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि सर्वाधिक नुकसान काँग्रेसला होत असल्याची टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामांना मान्यता दिली जात नाही, असं देखील ते म्हणाले.

अजित पवार सगळी काळजी घेतायत!
यावेळी बोलताना प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांचं पक्षाला कशा पद्धतीने फायदा मिळेल या दृष्टीने काम सुरू आहे, असं म्हणाले. ‘आज सत्तेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले, तरी शिवसेनेचा फायदा नसून नुकसानच होईल. राष्ट्रवादी, अजित पवार आपल्या लोकांना निधी कसा मिळावा, फायदा कसा मिळावा याची काळजी घेत आहेत. तसं काम सुरू आहे. पण यात सर्वात जास्त नुकसान काँग्रेसचं आहे. वीजबिलासंदर्भातली फाईल अर्थखात्याकडे गेली होती. पण सरकारने मान्यता दिली नाही. काँग्रेसच्या मागण्यांना मान्यता मिळत नाही. यात सगळ्यात फायदेशीर राष्ट्रवादी असून शिवसेना आणि काँग्रेसचं नुकसान होत आहे’, असं ते म्हणाले. ‘उद्धव ठाकरेंच्या क्षमतेवर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण दुर्दैवाने इतर दोन पक्ष त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना राजकीय कसरती कराव्या लागत आहेत. सरकार म्हणून अपयश आल्यानंतर ते कुठल्या विभागावर किंवा मंत्र्यांवर जात नसून मुख्यमंत्र्यांवर जातं’, असं देखील ते म्हणाले.

काही लोकं सुपारी घेतल्यासारखं वागतायत!
दरम्यान, मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणी नोटीस बजावल्यासंदर्भात बोलताना प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली. ‘सरकारविरोधी भूमिका घेतल्यानंतर सुडाचं राजकारण होईल, हे अपेक्षितच होतं. काही लोकं सुपारी घेतल्यासारखे वागतायत. माझे व्यक्तिगत कुणाशीही वाद नाहीत. मी जाणीवपूर्वक कुणावर टीका करत नसतो. मी सरकारवर टीका करायला लागलो, तेव्हा सूडाचं राजकारण करू नये असं बोलणारेच सूडाचं राजकारण करतील हे अपेक्षित होतं. उद्धव ठाकरे एकवेळ करणार नाहीत. पण इतर लोकं त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या झाडतीलच हे माहीत होतं’, असं प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.

‘कर नाही त्याला डर कशाला’
कर नाही त्याला डर असण्याचं कारण नाही. ती संस्था माझ्या एकट्याची नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे लोकंही तिथे आहेत. संचालक एकटा निर्णय घेत नसतो हे नोटीस पाठवणार्‍यांना कळायला हवं. सगळे निर्णय घेत असतात. आम्हाला जी नोटीस आधीच पाठवली आहे, त्यांची उत्तरं दिली आहेत. चौकशीमध्ये देखील सहकार्य करत आहे.